पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (१२६ चेंडूंत नाबाद ११८) देशांतर्गत क्रिकेटमधील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे ब-गटातील या सामन्यात महाराष्ट्राची पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३५० अशी धावसंख्या होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियवर मंगळवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात तमिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात ऋतुराजच्या हाताला दुखापत झाली आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा राहुल त्रिपाठी (७) आणि सलामीवीर सिद्धेश वीर (९) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मात्र, अनुभवी केदार जाधव (७८ चेंडूंत ७८) आणि कर्णधार अंकित बावणे (८१ चेंडूंत ४५) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८१ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राचा डाव सावरला. विजय शंकरने केदारला बाद करत ही जोडी फोडली. मग बावणेसह अझीम काझी फलंदाजीला आला. काही काळाने बावणे बाद झाल्यानंतर ऋतुराज फलंदाजीसाठी खेळपट्टीवर परतला; परंतु काझीला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. यानंतर सौरभ नवले (५) आणि आशय पालकर (११) हे ठरावीक अंतराने बाद झाले. त्यामुळे महाराष्ट्राची ६ बाद २०८ अशी स्थिती झाली.

काझी खेळपट्टीवर परतला आणि त्याने ऋतुराजच्या साथीने महाराष्ट्राचा डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर हे दोघेही नाबाद राहिले. काझीने ११९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावांची खेळी केली. ऋतुराजने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक झळकावताना १६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ११८ धावा केल्या आहेत.