MUM vs MP Ranji Trophy Final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम टप्पा आजपासून सुरू झाला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरला आहे. शिवाय, अमोल मुजुमदार आणि चंद्रकांत पंडित या दोन दिग्गज माजी रणजीपटूंची प्रतिष्ठा या सामन्यात पणाला लागलेली आहे.

मध्य प्रदेशला विजेतेपदासाठी ४१ वेळच्या विजेत्या मुंबईशी झुंज द्यावी लागणार आहे. यावेळी मुंबईचे कर्णधारपद भारतीय संघाचा तारांकित सलामीवीर पृथ्वी शॉच्या हाती आहे. आपल्या संघाला विजेता बनवण्यासाठी तो सर्व शक्ती पणाला लावेल. सर्फराज खानने केवळ पाच सामन्यांमध्ये ८००हून अधिक धावा करून आपला खेळ पूर्णपणे वेगळ्या पातळीवर नेला आहे. खानच्या झंझावाताला यशस्वी जयस्वाल उत्तम साध देत आहे. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या चार डावांत तीन शतके ठोकून आपली धावांची तीव्र भूक स्पष्ट केली आहे. पृथ्वी शॉच्या हातांमध्ये कोणत्याही गोलंदाजांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे.

अरमान जाफरमध्ये त्याच्या दिग्गज चुलत्याची झलक दिसते. वसीम जाफरच्या तालमीत तयार झालेला अरमान केव्हाही प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकतो. त्यात आता सुवेद पारकर आणि हार्दिक तामोरे यांच्यासारख्यांची भर पडली आहे. मुंबईची फलंदाजी सध्या एखाद्या अभेद्य किल्ल्यांच्या बुरुजांप्रमाणे दिसत आहे. मजबुत फलंदाजीशिवाय मुंबईकडे डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणी (३७ बळी आणि २९२ धावा) आणि तनुष कोटियन (१८ बळी आणि २३६ धावा) हे दोन दुर्मिळ अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्यांना संकटाच्या काळात सामना कसा जिंकायचा हे माहिती आहे.

हेही वाचा – Wimbledon 2022 : हंगामातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी एईएलटीसी सज्ज, बघा व्हिडिओ

मध्य प्रदेशच्या संघाने या रणजी हंगामात आतापर्यंत मागील पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. तर मुंबईच्या संघाने गेल्या पाच सामन्यांपैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत. यावेळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हिरो ठरलेला रजत पाटीदार मध्य प्रदेशचा उपकर्णधार आहे. रजतने यावेळी आयपीएलमध्ये शतकही झळकावले होते. या रणजी हंगामात त्याने आपल्या संघासाठी आतापर्यंत पाच सामन्यात ५०६ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये फिरकीपटू कुमार कार्तिकेयने पाच सामन्यात २७ बळी घेऊन सर्वाधिक बळींच्या यादीत दुसरे स्थान मिळवलेले आहे.

मुंबईचा संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयसवाल, अरमान जाफर, सुवेद पारकर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, धवल कुलकर्णी, तनुष कोटियान, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे.


मध्य प्रदेशचा संघ : यश दुबे, हिमांशु मंत्री (यष्टीरक्षक), शुभम शर्मा, रजत पाटिदार, आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), अक्षत रघुवंशी, सारांश जैन, अनुभव अग्रवाल, गौरव यादव, कुमार कार्तिकेय, पार्थ साहनी.

Story img Loader