MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या (२२ जून) बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना रंगणार आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करणार आहे. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल तर मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरेल. शिवाय, अमोल मुजुमदार आणि चंद्रकांत पंडित या दोन दिग्गज माजी रणजीपटूंची प्रतिष्ठा या सामन्यात पणाला लागलेली आहे. त्यामुळे रणजी करंडकाचा अंतिम सामन्याची रंगत जास्तच वाढल्याचे चित्र आहे.
बुधवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. सर्फराज खानने केवळ पाच सामन्यांमध्ये ८००हून अधिक धावा करून आपला खेळ पूर्णपणे वेगळ्या पातळीवर नेला आहे. खानच्या झंझावाताला यशस्वी जयस्वाल उत्तम साध देत आहे. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या चार डावांत तीन शतके ठोकून आपली धावांची तीव्र भूक स्पष्ट केली आहे. पृथ्वी शॉच्या हातांमध्ये कोणत्याही गोलंदाजांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे.
अरमान जाफरमध्ये त्याच्या दिग्गज चुलत्याची झलक दिसते. वसीम जाफरच्या तालमीत तयार झालेला अरमान केव्हाही प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकतो. त्यात आता सुवेद पारकर आणि हार्दिक तामोरे यांच्यासारख्यांची भर पडली आहे. मुंबईची फलंदाजी सध्या एखाद्या अभेद्य किल्ल्यांच्या बुरुजांप्रमाणे दिसत आहे. मजबुत फलंदाजीशिवाय मुंबईकडे डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणी (३७ बळी आणि २९२ धावा) आणि तनुष कोटियन (१८ बळी आणि २३६ धावा) हे दोन दुर्मिळ अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्यांना संकटाच्या काळात सामना कसा जिंकायचा हे माहिती आहे.
हेही वाचा – थोडक्यात वाचला क्रिस्टियानो रोनाल्डो, कोट्यवधी रुपयांच्या गाडीचा झाला चुरा
मुंबईचा संघ तगडा दिसत असला तरी मध्य प्रदेशमध्ये त्यांचा सामना करण्याची क्षमता आहे. मध्य प्रदेशचा संघ हा अलीकडच्या काळातील सर्वात सुधारित संघांपैकी एक आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी करंडक स्पर्धेत शिखर गाठण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त या संघाने अंगी बाणवली आहे. फलंदाजीत व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाजीत आवेश खान यांच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी मोठ्या धाडसाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. कुमार कार्तिकेय, हिमांशू मंत्री आणि अक्षत रघुवंशी या सर्वांनी त्यांच्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडल्या आहेत. ज्या खेळाडूकडे भविष्यात भारतीय संघात पाऊल ठेवण्याची क्षमता आहे असा रजत पाटीदार मध्य प्रदेशकडे आहे.
एकूणच, रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार होईल याची हमी देणारे हे दोन्ही संघ आहेत. अमोल मुजुमदार आणि चंद्रकांत पंडित यांच्यासाठी हा सामना तर २२ यार्डांवर परसवलेला बुद्धिबळाचा पट असेल.