मुंबई : युवराजसिंह दोडिया (४/८६) आणि पार्थ भूत (४/५६) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे सौराष्ट्रने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटाच्या सामन्यात मुंबईवर ४८ धावांनी मात केली. गतउपविजेत्या मुंबईचा हा यंदाच्या रणजी हंगामातील पहिलाच पराभव आहे.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईला विजयासाठी ६२ धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे केवळ दोन बळी शिल्लक होते. मुंबईला ८ बाद २१८ धावसंख्येच्या पुढे खेळताना आणखी केवळ १३ धावांची भर घातली. त्यांचा डाव २३१ धावसंख्येवर आटोपला. तुषार देशपांडेला (१३) धमेंद्रसिंह जडेजाने बाद केले, तर शम्स मुलानीला (३४) दोडियाने माघारी पाठवले. त्यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. सलामीवीर पृथ्वी शॉ (६८), सूर्यकुमार यादव (३८) आणि मुलानी वगळता मुंबईच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात चुणूक दाखवता आली नाही.
मुंबईचा पुढील सामना तमिळनाडूशी (३ जानेवारीपासून) होणार आहे. यापूर्वी, मुंबईने आंध्र प्रदेश आणि हैदराबाद यांना नमवले होते.