Ranji Trophy 2024-25 Mumbai beats Maharashtra by nine wickets : सोमवारी मुंबईतील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने महाराष्ट्राचा नऊ गडी राखून पराभव केला. यासह मुंबईने रणजी करंडक २०२४-२५ या हंगामातील पहिला विजय नोंदवला. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि हार्दिक तामोरे यांनी चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने दिलेल्या ७४ धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबईचा विजय सामन्याच्या पहिल्याच दिवशी निश्चित झाला होता.

या सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातच मुंबईने महाराष्ट्राला १२६ धावांत गुंडाळले होते. प्रत्युत्तरात १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेने शानदार शतक झळकावून संघाचा पाया रचला, त्यानंतर श्रेयस अय्यरने आणखी एक शतक झळकावून संघाला ३१५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार शतकामुळे महाराष्ट्राने दुसऱ्या डावात कडवे आव्हान उभे केले. पण, पाहुण्या संघ विजय मिळवू शकला नाही. या सामन्यतील दोन्ही डावात महाराष्ट्राने अनुक्रमे १२६ आणि ३८८धावा केल्या होत्या, तर मुंबईने पहिल्या डावात ४४१ आणि दुसऱ्या डावात ७५ धावा करुन सामना जिंकला.

दुससरा दिवस श्रेयस आणि आयुषने गाजवला –

या सामन्याचा दुसरा दिवस मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष म्हात्रे, तर महाराष्ट्रासाठी हितेश वाळुंज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी गाजवला. श्रेयसने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील १४वे शतक साकारताना १२ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने १४२ धावांची खेळी केली. १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेनेही (२३२ चेंडूंत १७६) अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ४४१ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली भारताच्या पराभवानंतर रमला कीर्तनात, पत्नी अनुष्काबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल

त्याआधी, दुसऱ्या दिवशी ३ बाद २२० धावांवरून पुढे खेळताना मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी रचली. आयुष द्विशतकी मजल मारणार असे वाटत असतानाच डावखुरा फिरकीपटू हितेश वाळुंजने त्याला माघारी धाडले. आयुषने १७६ धावांची खेळी २२ चौकार आणि ४ षटकारांनी सजवली. यानंतर मात्र वाळुंजच्या प्रभावी माऱ्यापुढे मुंबईने ठरावीक अंतराने गडी गमावले.