Ranji Trophy 2024 Final, Mumbai Vs Vidarbha : रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्याला रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाली आहे. या सामन्यात मुंबई आणि विदर्भाचा संघ आमनेसामने आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाने पहिला दिवस संपेपर्यंत १३ षटकानंतर ३ बाद ३१ धावा केल्या असून मुंबईच्या तुलनेत १९३ धावांनी पिछाडीवर आहे.
मुंबईची पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रहाणे आणि श्रेयस अय्यर सात धावा करून बाद झाले. हार्दिक तामोरे पाच आणि शम्स मुलानी १३ धावा करून बाद झाला.
अष्टपैलू शार्दुल ठाकूरने झळकावले अर्धशतक –
यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरने ३७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. शार्दुलने १३१.५८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना हे अर्धशतक पूर्ण केले. तनुष कोटियन आठ धावा करून बाद झाला तर तुषार देशपांडे १४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुंबईचा डाव २२४ धावांवर आटोपला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर उमेश यादवने दोन गडी बाद केले. आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.
हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : अय्यर-रहाणे पुन्हा ठरले फ्लॉप! मुंबईच्या खराब फलंदाजीवर सचिनने व्यक्त केली नाराजी
विदर्भ संघाची पहिली विकेट ध्रुव शौरीच्या रूपाने पडली ज्याला आपले खातेही उघडता आले नाही. ध्रुव शौरी संघासाठी सलामीला आला होता, मात्र शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. अवघ्या एका धावेवर या संघाची पहिली विकेट पडली आणि आता अमन मोखाडे फलंदाजीसाठी क्रीझवर आला आहे. यानंतरविदर्भाने २० धावांवर आपली दुसरी विकेट गमावली.
विदर्भ १९२ धावांनी पिछाडीवर –
अमन मोखाडेला मुंबईचा गोलंदाज धवल कुलकर्णीने बाद केले. तो आठ धावा करुन बाद झाला. यानंतर तिसऱ्या विकेट्सच्या रुपाने करुण नायर शून्यावर बाद झाला. अशा प्रकारे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने पहिल्या डावात ३ गडी गमावून ३१ धावा केल्या आहेत आणि अजूनही मुंबईपेक्षा १९२ धावांनी मागे असून अथर्व तायडे (२१) आणि आदित्य ठाकरे (०) नाबाद आहेत.