सोलापूर : सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडिअमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरूध्द मणिपूर रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी मणिपूरचा संघ अवघ्या १३७ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने ५ बळी तर प्रदीप दाढे याने ४ बळी घेऊन चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राचा संघ ३ गडी बाद १२३ धावा़वर खेळत असून यात कर्णधार केदार जाधव आणि सिध्देश वीर यांच्यात झालेली ९४ धावांची भागीदारी महाराष्ट्राला सामन्यावर पकड घेणारी ठरली.
हेही वाचा >>> ICC Awards 2023 : विराट किंवा जडेजा ठरु शकतात वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, ‘या’ दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही समावेश
सोलापुरात तब्बल २९ वर्षांनी रणजी क्रिकेट सामना खेळला जात आहे. महाराष्ट्र व मणिपूरदरम्यान खेळण्यात येणा-या या सामन्यात नाणेफेक जिंकून मणिपूरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. दुपारी जेवणासाठीच्या विश्रांतीपर्यंत मणिपूरने ५ गडी गमावून ९० धावा केल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या भेदाक गोलंदाजीपुढे मणिपूरचा डाव उर्वरीत अवघ्या ४७ धावांमध्ये संपुष्टात आला. हितेश वाळुंज याने ३३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी टिपले तर त्यास योग्य साथ देताना प्रदीप दाढे यानेही ३५ धावा देऊन ४ गडींना तंबूत पाठविले. महाराष्ट्राकडून सिध्देश वीर आणि ओंकार खाटपे हे फलंदाज सलामीला आले. परंतु ओंकार अवघ्या १० धावांतच झटपट बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर नौशाद शेख (५ धावा) यानेही निराशा केली, मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार केदार जाधव याने सिध्देश वीरसोबत ९४ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राला मजबूत स्थितीत आणले. सिध्देश ५८ धावांवर बाद झाला. तर केदार जाधव ४९ धावांवर नाबाद खेळत आहे. मणिपूरच्या बिष्णोजित याने ४१ धावांच्या मोबदल्यात महाराष्ट्राचे दोन गडी बाद केले. तर किशन संघा याने ३८ धावांत एक गडी बाद केला.