Sachin Tendulkar Upset on Mumbai Batsmen : रणजी ट्रॉफी २०२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी विदर्भाच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले. पहिल्या दिवशी पहिल्या डावात मुंबईचे ७ फलंदाज अवघ्या १७२ धावांत गारद झाले होते. अजिंक्य रहाणेपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत फ्लॉप ठरले. ज्यानंतर टीम इंडियाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्याने मुंबईच्या फलंदाजांना एक क्लास दिला.
अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही काळ सामना चांगलाच रंगत होता. मुंबईचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी चांगले फटकेबाजी करुन संघाला चांगली सुरुवात करून दिली. १९व्या षटकापर्यंत मुंबईचा संघ चांगल्या लयीत दिसत होता. यानंतर भूपेन लालवाणीच्या रूपाने मुंबईला पहिला धक्का बसला.
भूपेन ललवानी ३७ धावा करून बाद झाला. यानंतर पृथ्वी शॉही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि २३व्या षटकात बाद झाला. पृथ्वी शॉ ४६ धावा करून बाद झाला. यानंतर मुंबईच्या विकेट पडत राहिल्या आणि १७२ धावांतच मुंबईचा निम्म्याहून अधिक संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईच्या फलंदाजांच्या या खराब कामगिरीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत होता.
हेही वाचा – IND vs ENG : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर नासेर हुसैन संतापला; म्हणाला, ‘Bazball’मुळे इंग्लंड…
सचिन तेंडुलकर मुंबईच्या फलंदाजांवर नाराज –
मुंबईचे फलंदाज ज्या पद्धतीने खेळले त्यावर सचिन तेंडुलकर खूश नव्हता. यानंतर सचिन तेंडुलकरनेलिहिले की, “संघाला चांगली सुरुवात मिळूनही मुंबईचे फलंदाज अतिशय सामान्य क्रिकेट खेळले. विदर्भाने गोष्टी साध्या ठेवल्या आणि मुंबईला दडपणाखाली ठेवले. मला खात्री आहे की, सामन्यात अजून अनेक रोमांचक सत्रे होतील. खेळपट्टीवर गवत दिसत आहे. परंतु जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा चेंडू अधिक वळेल आणि फिरकी गोलंदाजांना खूप मदत होईल. मुंबईच्या सलामीवीरांनी भक्कम भागीदारी केल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे खेळात पुनरागमन केले त्यामुळे विदर्भ नक्कीच आनंदी असेल. तसेच पहिले सत्र विदर्भाच्या नावे होते.”
रहाणे-अय्यर पुन्हा फ्लॉप शो –
अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर पहिल्या डावात पुन्हा फ्लॉप ठरले. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी केवळ ७ धावा केल्या. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पुन्हा चाहत्यांचे लक्ष्य बनले आहेत. कारण मागील सामन्यातही दोघे स्वस्तात बाद झाले होते.
हेही वाचा – IPL 2024: ऋषभ पंत आयपीएल खेळण्याबाबत संभ्रमच, NCA मुळे दिल्लीची वाढली धाकधूक
मुंबईचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी १३ धावा करून बाद झाला. यानंतर शार्दुल ठाकुरने ७५ धावांची खेळी साकारत मुंबईला दोनशेचा टप्पा पार करुन दिला. विदर्भकडून यश दुबे आणि हर्ष ठाकुर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.