Jammu Kashmir beat Mumbai by 5 Wickets : रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यात जम्मू-काश्मीरने इतिहास घडवला आहे. जम्मू-काश्मीरने गतविजेत्या मुंबईचा पराभव केला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईत संघात रोहित शर्मा, श्रेयस अय्यरसारखे अनेक दिग्गज खेळाडू होते. पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे पारस डोगराच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली.
युधवीर सिंगने जम्मू-काश्मीरसाठी अप्रतिम कामगिरी केली. त्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. मुंबईच्या पहिल्या डावात युधवीरने ८.२ षटके गोलंदाजी केली. या काळात त्याने ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. यासोबतच दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. युधवीरने दुसऱ्या डावात १५ षटके टाकली आणि ६४ धावा दिल्या. त्याने संघासाठी काही धावाही जोडल्या. युधवीरने पहिल्या डावात २० धावा केल्या होत्या.
रोहित-रहाणे अय्यरसह अनेक दिग्गज फ्लॉप –
मुंबईचा संघ पहिल्या डावात १२० धावांवर सर्वबाद झाला होता. यादरम्यान रोहित ३ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. रहाणे १२ धावा करून बाद झाला तर अय्यर ११ धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने ५१ धावांचे योगदान दिले होते. संघाने दुसऱ्या डावात २९० धावा केल्या. यादरम्यान शार्दुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ११९ धावा केल्या. तर तनुष कोटियनने ६२ धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत.
जम्मू-काश्मीरने नोंदवला ऐतिहासिक विजय –
जम्मू-काश्मीरसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. त्याने गतविजेत्या मुंबईचा पराभव केला आहे. संघाने पहिल्या डावात २०६ धावा केल्या होत्या. यादरम्यान शुभम खजुरियाने ५३ धावा केल्या होत्या. अदीब मुश्ताकने ४४ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात ५ गडी गमावून २०७ धावा केल्या आणि विजय मिळवला. जम्मू-काश्मीरसाठी मुश्ताकने दुसऱ्या डावात नाबाद ३२ धावा केल्या.