Mohammed Azharuddeen century against Gujarat in Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीच्या या हंगामातील पहिला उपांत्य सामना सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील केरळ आणि गुजरात यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवसअखेर संघाने ७ विकेट्स गमावून ४१८ धावा केल्या होत्या. संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनच्या शतकी खेळीने केरळच्या धावसंख्येला या स्थानावर नेण्यात मोठी भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अझरुद्दीनने झळकावले दुसरे शतक –

या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळने त्यांचे पहिले ३ विकेट्स ८६ धावांत गमावले पण त्यानंतर कर्णधार सचिन बेबीने जलज सक्सेनासोबत चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर या संघाची चौथी विकेट १५७ धावांवर पडली आणि जलज सक्सेना ३० धावा करून बाद झाला. त्यानंतर सचिनने अझरुद्दीनसोबत पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली आणि कर्णधार स्वतः ६९ धावा करून बाद झाला.

यानंतर, मोहम्मद अझरुद्दीनने डावावर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि त्याचे शतक पूर्ण केले. बातमी लिहिपर्यंत, अझरुद्दीनने १४९ धावा केल्या होत्या आणि तो क्रीजवर उभा होता. अझरुद्दीनचे हे त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शतक झळकावणारा केरळचा पहिला फलंदाज बनून इतिहास घडवला. अझरुद्दीनच्या आधी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात केरळच्या इतर कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली नव्हती.

केरळकडून, खालच्या फळीतील फलंदाज सलमान नझीरनेही या सामन्याच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. त्याने २०२ चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. यानंतर अहमद इम्राननेही ६६ चेंडूत ३ चौकारांसह २४ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर केरळचा अझरुद्दीन १४९ धावांवर नाबाद होता तर आदित्य १० धावांवर नाबाद होता.