Ranji Trophy 2025 Shardul Thakur Century : रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई संघासाठी दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने शानदार शतकी खेळी साकारत मुंबई संघाचा डाव सावरला. शार्दुलचे शतक अशा वेळी आले, जेव्हा मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी या सामन्यात फलंदाजी करताना पुन्हा एकदा अत्यंत खराब कामगिरी केली. त्याने १०५ चेंडूत शतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने या सामन्याच्या पहिल्या डावातही सर्वाधिक ५१ धावा केल्या होत्या.
शार्दुल ठाकूरच्या शतकाने मुंबईला तारलं –
मुंबईने दुसऱ्या डावात ९१ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर १०१ धावांवर संघाने सातवी विकेट्स गमावली. यानंतर शार्दुल आणि तनुष कोटियन यांनी पायाभरणी केली. शार्दुलने स्फोटक कामगिरी करत शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत त्याने ११२ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या. शार्दुलच्या खेळीत १५ चौकारांचाही समावेश होता. शार्दुलच्या शतकाबरोबरच तनुष कोटियननेही शानदार कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले आहे. तनुषने १०७ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. शार्दुल आणि तनुषच्या खेळीच्या जोरावर मुंबईने ७ गडी गमावून २६५ धावा केल्या होत्या.
शार्दुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील झळकावले दुसरे शतक –
शार्दुल ठाकूर बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो आतापर्यंत पुनरागमन करू शकला नाही. अशा परिस्थितीत, रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये फलंदाजीसह त्याची चमकदार कामगिरी त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग खुला करू शकते. शार्दुल ठाकूरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. याशिवाय शार्दुलने १३ अर्धशतक झळकावली आहेत. शार्दुलच्या या शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाला या सामन्यात पुनरागमन करता आले असून त्यांनी जम्मू-काश्मीरविरुद्ध १५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
शार्दुल ठाकूरला लाभली तनुष कोटियनची साथ –
मुंबई संघाच्या जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात आघाडीच्या फळीतील फलंदाजांची अतिशय खराब कामगिरी पाहायला मिळाली, ज्यामध्ये रोहित शर्माने २८ धावा केल्या तर यशस्वी जैस्वालने २६ धावा केल्या. मुंबई संघाने दुसऱ्या डावात १०१ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या, येथून शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियनने मुंबईच्या डावाची धुरा सांभाळली आणि २५० धावांचा टप्पा ओलांडून सामन्यात पुनरागमन केले.