Ranji Trophy 2025 Shubman Gill century against Karnataka : भारतीय कसोटी संघाचे प्रमुख फलंदाज रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी झाले आहेत. आतापर्यंत एक-दोन खेळाडू सोडले तर इतर सर्वांचीच कामगिरी निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्मा-यशस्वी जैस्वाल ते ऋषभ पंतपर्यंत सर्व या स्पर्धेत आपापल्या संघासाठी खेळत आहे. मात्र, शुबमन गिलने कर्नाटकविरुद्धच्या पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावलं तरीही पंजाबला पराभव पत्करावा लागला. कर्नाटकाने हा सामना एक डाव आणि २०७ धावांनी जिंकला.
२५ वर्षीय शुबमन गिल दोन वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १४ वे शतक आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने १५९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. १०२ धावांची इनिंग खेळल्यानंतर गिलला लेगस्पिनर श्रेयस गोपालने एलबीडब्ल्यू आऊट केले. १७१ चेंडूंच्या खेळीत पंजाबच्या कर्णधाराने १४ चौकार आणि ३ षटकारही मारले.
८४ धावांवर पडल्या होत्या ६ विकेट्स –
कर्नाटकविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात पंजाबची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. संघ अवघ्या ५५ धावांत ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावातही स्थिती चांगली नव्हती. यानंतर दुसऱ्या पंजाब संघाने ८४ धावांपर्यंत ६ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर सलामीवीर शुबमन गिलला मार्कंडेयने चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये सातव्या विकेट्ससाठी ६३ धावांची भागीदारी झाली.
पंजाबचा संघ डावाने झाला पराभूत –
पंजाबने हा सामना एक डाव आणि २०७ धावांनी गमावला. शुबमन गिलच्या शतकानंतरही त्यांचा संघ दुसऱ्या डावात २१३ धावांवर बाद झाला. कर्नाटकने पहिल्या डावात ४७५ धावा केल्या होत्या. समर्थ आरने एकट्याने २०३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ४० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. मात्र, सर्वांनी दुहेरी आकडा गाठला आणि संघाला ४७५ धावांपर्यंत पोहोचवले.