Ranji Trophy 2025 Virat Kohli security 3 persons reached on ground : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सध्या दिल्ली आणि रेल्वे यांच्यात रणजी सामना सुरू आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहलीही खेळत असून, ज्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी, एक जबरा चाहता सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून त्याला भेटण्यासाठी मैदानावर पोहोचला, ज्यामुळे बरीच चर्चा झाली. ही घटना आता पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे, जिथे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन चाहते मैदानाच्या पोहोचल्याची घटना घडली.
तीन चाहते सुरक्षारक्षकांचा घेरा भेदून मैदानावर पोहोचले –
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी खेळाच्या पहिल्या सत्रादरम्यान ३ चाहत्यांनी सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून मैदानात प्रवेश केला. ही घटना तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात १८व्या षटकात दिल्ली संघ क्षेत्ररक्षण करत असताना घडली. यादरम्यान ३ चाहते अचानक गौतम गंभीर स्टँडमधून बाहेर आले आणि विराट कोहलीच्या दिशेने धावले. त्यापैकी एकाने कोहलीच्या पायाला स्पर्श केला, त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांने त्याला पकडून मैदानातून बाहेर काढले. यात दोन मुले असून एकाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
विराट कोहलीच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण –
विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कोहलीला त्याच्या घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून या सामन्याच्या पहिल्या दिवशीही विराट कोहलीला भेटण्यासाठी एक क्रिकेट चाहता मैदानात दाखल झाला होता. पहिल्या दिवशीही ती व्यक्ती कोहलीच्या पायाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरली. बरं, या सामन्यादरम्यान अशी घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे जी अजिबात योग्य नाही. आपल्या बड्या खेळाडूंसोबत अशी घटना दोनदा घडली तर त्याच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या सामन्यात प्रचंड गर्दी होती, मात्र दुसऱ्या दिवशी विराट कोहली बाद होताच संपूर्ण स्टेडियम जवळपास रिकामे झाले होते. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर फारशी गर्दी नव्हती, कदाचित क्रिकेट चाहते कोहलीच्या फलंदाजीची वाट पाहत होते. दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या फलंदाजी करताना पाहण्यासाठी स्टेडियमध्ये पुन्हा मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र दिल्लीला दुसऱ्या डावात फलंदाज करण्याची वेळ आली नाही. कारण दिल्लीने रेल्वेचा एक डाव आणि १९ धावांनी पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने निराशा केली आणि ६ धावा करून बाद झाला.