वानखेडे स्टेडियमवरील रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबईने चालू हंगामातील आपला तिसरा विजय निश्चित करून ठेवला. एकीकडे मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भाचा डाव अवघ्या ११३ धावांत गुंडाळून पराक्रम दाखवला, तर दुसरीकडे फलंदाजांनी १ बाद १७९ अशी दमदार मजल मारून आपले शक्तिप्रदर्शनच जणू केले. सलामीवीर फलंदाज आदित्य तरेने सलग दुसऱ्या शतकाची नोंद करीत मुंबईच्या डावात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेची (खेळत आहे ६२) सुयोग्य साथ लाभली. त्यामुळे मुंबईच्या खात्यावर सध्या तरी एकंदर ३२७ धावांची आघाडी आहे. आता तिसऱ्या दिवशी मुंबई किती मोठी आघाडी घेऊन विदर्भाला फलंदाजीची संधी देते, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबईच्या पहिल्या डावाला सावरणारा अनुभवी फलंदाज वसिम जाफर सकाळी १३९ धावांवर बाद झाला आणि अल्पावधीतच यजमानांचा डाव फक्त २६१ धावांवर आटोपला. त्यानंतर विदर्भच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावण्याची मुंबईच्या गोलंदाजांनी अजिबात संधी दिली नाही. मुंबईच्या संघापुढे विदर्भाची लढत ही बलाढय़ विरुद्ध दुबळा संघ अशीच भासत होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने ७-१-३०-२ असे लक्षवेधक पृथक्करण राखत शलभ श्रीवास्तव आणि हेमांग बदानी या दोन महत्त्वाच्या फलंदाजांचे लागोपाठच्या चेंडूंवर बळी घेतले. त्याचा साथीदार वेगवान गोलंदाज अकबर खान याने रणजी पदार्पण झोकात साजरे करताना २८ धावांत २ बळी घेतले. तर शार्दूल ठाकूरने ४० धावांत ३ बळी घेतले. विदर्भकडून सर्वाधिक ३४ धावा रश्मी परिदाने केल्या. त्याने अक्षत वाखरेसोबत नवव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदरी केली. ती वगळता विदर्भाकडून मोठी भागीदारी झाली नाही.
मुंबईच्या दुसऱ्या डावात कौस्तुभ पवार(६) केली. परंतु तरे आणि रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी मुंबईसाठी महत्त्वाची ठरली. यंदाच्या रणजी हंगामातील हरयाणा आणि पंजाब यांच्याविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या तरेला त्यानंतर मात्र चांगलाच सूर गवसला. वांद्रे-कुर्ला संकुल येथे झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे ५३ आणि १२२ धावा केल्या होत्या. विदर्भाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात सहाव्या क्रमांकाला फलंदाजीला उतरणाऱ्या तरेला फक्त १७ धावा करता आल्या होत्या. परंतु जाफरच्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात सलामीला उतरणाऱ्या तरेने ११४ चेंडू आणि १५७ मिनिटे मैदानावर टिकाव धरून १३ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ११० धावांची खेळी साकारली. त्याने उमेश यादववर हल्ला चढवत लाँग लेग आणि स्क्वेअर लेगला दोन षटकार ठोकले, तर ९९ धावांवर पोहोचल्यावर अक्षत वाखरेला लाँग ऑफला गगनचुंबी षटकार ठोकून आपल्या शानदार शतकाची नोंद केली. रहाणेनेही लाँग ऑनला षटकार खेचून आपले अर्धशतक साजरे केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९३.५ षटकांत सर्व बाद २६१ (वसिम जाफर १३९, अभिषेक नायर २७, शार्दूल ठाकूर २६; संदीप सिंग ४/३५, रवी जांगिड ३/४८, अक्षय वाखरे २/६५)
विदर्भ (पहिला डाव) : ४१.४ षटकांत सर्व बाद ११३ (फैझ फझल २२, रश्मी परिदा ३४; झहीर खान २/३०, अकबर खान २/२८, शार्दूल ठाकूर ३/४०)
मुंबई (दुसरा डाव) : ३६ षटकांत १ बाद १७९ (आदित्य तरे खेळत आहे ११०, अजिंक्य रहाणे खेळत आहे ६२; उमेश यादव १/५७)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा