मुंबईच्या पृथ्वी शॉने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. शुक्रवारी आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने आणखी एक पराक्रम केला. त्याने या सामन्यात १७३ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं ११४ धावांची दमदार खेळी केली. प्रथम श्रेणीतील सातव्या सामन्यातील त्याचे हे पाचवे शतक आहे. पृथ्वीचे रणजी स्पर्धेतील हे चौथे शतक आहे. कारकिर्दीतील १३ डावात त्याने हा पराक्रम केला.
वयाच्या अठराव्या वर्षी प्रथम श्रेणीत सर्वाधिक शतके करणारा पृथ्वी शॉ दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिननं असा पराक्रम केला होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत ७ शतके झळकावली होती. मागील सात सामन्यात पृथ्वीने ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. केवळ सहाव्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. सहाव्या सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता.
गेल्या हंगामात पृथ्वी शॉने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी पदार्पण केलं. यानंतर भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय संघामध्येही पृथ्वीने चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक झळकावल्यानंतर पृथ्वीने यंदाच्या दुलीप करंडकातही पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली होती. भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या इंग्लंड दौऱ्यात पृथ्वी शॉने चांगली कामगिरी केली होती.