कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे यांनी कसदार फलंदाजांप्रमाणे आत्मविश्वासाने खेळ करीत हा थरार थोपविला. त्यामुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात ५ बाद २७२ धावांची मजल मारता आली.
उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या या लढतीत नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने लागल्यावर कर्णधार रोहित मोटवानीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र त्याचा अपेक्षेइतका फायदा महाराष्ट्राला घेता आला नाही. खराब सुरुवातीनंतर खुराणा (६४) व अंकित बावणे (नाबाद ८९) यांनी खेळपट्टीबाबत बाऊ करण्याची आवश्यकता नाही, याचाच प्रत्यय घडवत संघाला सुस्थितीत नेले. खराब प्रारंभामुळे महाराष्ट्राच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षेइतकी आक्रमक फलंदाजी करता आली नाही. एकेरी व दुहेरी धावांवरच त्यांना अधिकाधिक भर द्यावा लागला. पहिल्या सत्रात कर्नाटकच्या गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. त्यांचा कर्णधार आर. विनय कुमारने वेगवान गोलंदाजांना छोटे-छोटे ‘स्पेल’ देत महाराष्ट्राच्या फलंदाजांवर दडपण ठेवले.
राष्ट्रीय निवड समितीच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या हर्षद खडीवाले, विजय झोल व केदार जाधव यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. खडीवाले (१५) व झोल (५) यांनी सपशेल निराशा केली. खडीवाले हा या मोसमातील एक हजार धावांचा टप्पा पार करील असे वाटले होते, मात्र त्यासाठी पाच धावा कमी असतानाच तो बाद झाला. अंतिम सामन्याचे दडपण त्यांच्यावर होते, हे त्यांनी केलेल्या चुकांवरून स्पष्ट झाले.
जाधव हा अंतिम सामन्यात मोठी फलंदाजी करील असे वाटले होते. मात्र लक्षवेधक कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. ४४ चेंडूंमध्ये त्याने सहा चौकारांसह ३७ धावा केल्या. यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. या मोसमात त्याने ८५ धावांच्या सरासरीने १,१११ धावा केल्या आहेत.
एका बाजूने अनुभवी फलंदाज तंबूचा रस्ता पकडत असताना चिराग खुराणाने आश्वासक फलंदाजी केली. एरवी तळाच्या फळीत खेळणाऱ्या चिरागने सलामीला येऊन तब्बल २१२ मिनिटांचा झुंजार खेळ केला. १४ धावांवर जीवदान मिळालेल्या खुराणाने आपण सलामीतही चांगली कामगिरी करू शकतो, याचा प्रत्यय घडविला. त्याने या मोसमातील स्वत:चे पहिले अर्धशतक टोलवताना आठ चौकारांसह ६४ धावा केल्या. त्याने जाधवच्या साथीने ४८ धावा तर बावणेच्या साथीने ५४ धावांची भागीदारी केली. करुण नायरच्या षटकात स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात खुराणा पायचीत झाला. या विकेटमुळे नायरला रणजीतील पहिल्या बळीचा आनंद मिळाला.
उपाहार ते चहापान या टप्प्यात महाराष्ट्राने केवळ खुराणाचा बळी देत १०० धावा जमविल्या. खुराणा बाद झाल्यानंतर बावणेने मोटवानीच्या साथीत २२.१ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. त्यामध्ये त्याने आत्मविश्वासाने खेळ करीत स्वत:चे अर्धशतक व संघाच्या २०० धावांही पूर्ण केल्या. त्याचे या मोसमातील सहावे अर्धशतक आहे. चहापानानंतर मोटवानी हा मिथुनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक चिदंबरम गौतमकडे झेल देत बाद झाला. त्याने १७ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या संग्राम अतितकरने बावणेला चांगली साथ दिली. या जोडीने कर्नाटकच्या गोलदाजांना समर्थपणे तोंड देत संघाच्या २५० धावा पूर्ण केल्या. त्यांनी दमदार खेळ करीत ५७ धावांची अखंडित भागीदारी केली. बावणेने १७२ चेडूंमध्ये दहा चौकारांसह नाबाद ८९ धावा केल्या. अतितकरने पाच चौकारांसह नाबाद २९ धावा केल्या. अखेरच्या सत्रात महाराष्ट्राने २४ षटकांमध्ये ७७ धावांची भर घातली. गुरुवारी खेळाचा पहिला तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही जोडी आणखी किती भागीदारी करते, यावरच महाराष्ट्राचा ४०० धावांचा डोंगर रचण्याचे ध्येय अवंलबून आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ५ बाद २७२ (अंकित बावणे खेळत आहे ८९, चिराग खुराणा ६४, केदार जाधव ३७, संग्राम अतितकर खेळत आहे २९, अभिमन्यू मिथुन २/३८, करूण नायर १/२१, आर.विनय कुमार १/५६, श्रीनाथ अरविंद १/६२
‘‘महाराष्ट्राला ४०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी मी व संग्राम यांच्यावर आहे. त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल आहे. अंतिम सामन्याचे थोडेसे दडपण आल्यामुळे आमचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले.’’ -अंकित बावणे
हैदराबादी बिर्यानी
विनय कुमारचे कल्पक नेतृत्व!
महाराष्ट्राकडे शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी आहे, हे लक्षात घेऊनच कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमारने आपल्या गोलंदाजांचा कल्पकतेने उपयोग करीत महाराष्ट्राच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. त्याने आलटून पालटून गोलंदाजीत बदल करीत महाराष्ट्राच्या फलंदाजांना तडाखेबाज फटकेबाजीपासून वंचित ठेवले. मात्र महाराष्ट्राच्या मधल्या फळीतील फलंदाजांना बाद करण्यासाठी त्याला झगडावे लागले. त्यामुळेच की काय बदली गोलंदाजांसह त्याने आठ गोलंदाजांचा उपयोग केला.
क्रिकेटचाहत्यांची सामन्याकडे पाठच!
रणजीसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना येथे सुरू असताना प्रेक्षकांचा अभावच दिसून आला. उप्पलचे स्टेडियम हैदराबाद शहरापासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. अंतिम सामन्यात खेळत असलेले महाराष्ट्र व कर्नाटक हे दोन्ही संघ त्यांच्यासाठी परकेच आहेत. तसेच दोन्ही संघांत जागतिक स्तरावरील कीर्तिवान खेळाडूही नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवणेच पसंत केले.
राष्ट्रीय निवड समितीची उपस्थिती!
रणजी स्पर्धा हे भारतीय संघाचे प्रवेशद्वार मानले जात असल्यामुळे ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीचे सर्व सदस्य या सामन्याला आवर्जून उपस्थित होते. त्यांनी सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीची बारकाईने पाहणी केली, तसेच दोन्ही संघांमधील खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. – डी. मिलिंद