Ranji Trophy 10th Std Student Debut form Bengal: रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या फेरीला २३ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. रणजी सामन्यांच्या या दुसऱ्या फेरीत भारताचे अनेक खेळाडू खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, शुबमन गिल हे खेळाडू पहिल्याच दिवशी अपयशी ठरले. पण सौराष्ट्रकडून खेळत असलेल्या रवींद्र जडेजाने मात्र आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. दिल्लीविरूद्ध सामन्यात जडेजाने ऋषभ पंतच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवले. याशिवाय काही नव्या खेळाडूंनीही रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. एलिट ग्रुप-सीमध्ये बंगालचा संघ घरच्या मैदानावर हरियाणा संघाविरूद्ध खेळत आहे, ज्यामध्ये १५ वर्षे ३६१ दिवस वय असलेल्या अंकित चॅटर्जी नावाच्या खेळाडूला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
बंगाल संघातून पदार्पण करण्याबरोबरच अंकितने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि डावखुरा खेळाडू सौरव गांगुलीचा मोठा विक्रमही मोडला. अंकित चॅटर्जी हा १५ वर्षांचा असून तो दहावीत शिकत आहे आणि श्यामबाजार क्लबकडून तो क्रिकेट खेळतो. आता तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा बंगाल संघातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. गांगुलीशिवाय अंकितने बंगाल संघाचे विद्यमान प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांचाही विक्रम मोडला आहे.
रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर, बंगाल संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले आणि हरियाणा संघाचा पहिला डाव १५७ धावांवर आटोपला. अंकित हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताचा ऑफस्पिन गोलंदाजही आहे.
हरियाणाला १५७ धावांवर सर्वबाद केल्यानंतर बंगालकडून सर्वात तरूण खेळाडू अंकित चॅटर्जी व्रितिक चॅटर्जीसह सलामीला उतरला. संघाचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन दुखापतग्रस्त असल्याने त्याला सलामीला उतरण्याची संधी मिळाली. पण व्रितिक १ धाव करत बाद झाला. यानंतर २० चेंडूत ५ धावा करत अंकित चॅटर्जी मैदानात कायम आहे. अंकितने हरियाणाचा भेदक गोलंदाज अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर एक जबरदस्त चौकार खेचला आणि मनसुबे दाखवून दिले आहेत. तर त्याच्या जोडीला मैदानात रोहित कुमार आहे. यासह बंगालच्या संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ बाद १० धावा केल्या आहेत.
?Ankit Chatterjee becomes the youngest debutant in Ranji Trophy for Bengal at the age of 15 years and 361 days, surpassing Sourav Ganguly and current head coach Laxmi Ratan Shukla.
— RevSportz Global (@RevSportzGlobal) January 23, 2025
He is studying in class 10 right now and plays for Shyambazar Club. #RanjiTrophy @CabCricket pic.twitter.com/N6QpEiBhzm
या सामन्यातील पहिल्या डावात हरियाणा संघाकडून केवळ कर्णधार अंकित कुमारने ५७ धावांची खेळी खेळण्यात यश मिळवले, याखेरीज इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही. बंगालकडून सूरज जैस्वालने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने १२.५ षटकात ४६ धावा देत ६ विकेट्स घेतल्या, याशिवाय मुकेश कुमार आणि मोहम्मद कैफ यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. बंगालचा संघ सध्या १४ गुणांसह एलिट गट-क मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.