मुंबई : सलामीच्या लढतीत बडोद्याविरुद्धचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. मात्र, आम्ही त्यातून धडा घेतला असून महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आमचे विजयी पुनरागमनाचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरने व्यक्त केली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि महाराष्ट्र या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील सामना आज, शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे.
‘‘विजय आणि पराभव हा खेळाचा भागच आहे. मुंबईचा संघ नेहमीच कठीण परिस्थितीतून सामने जिंकत आला आहे. मात्र, कधी तरी एक सामना येतो, ज्यात आम्हालाही पराभव पत्करावा लागतो. रणजी स्पर्धेत आम्हाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. बडोद्याविरुद्धचा पराभव हा आमच्यासाठी धक्का होता. मात्र, त्यानंतर खेळाडूंना आपल्या खेळाचा विचार करण्यास वेळ मिळाला. आता दुसऱ्या लढतीत कामगिरीत सुधारणेचा आम्हाला विश्वास आहे,’’ असे शार्दूलने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
इराणी चषकात आजारी असतानाही शार्दूलने संघासाठी योगदान दिले. याबाबत तो म्हणाला, ‘‘अनेक वर्षे मुंबईला इराणी चषकाचे जेतेपद मिळवता आले नव्हते. यंदा जायबंदी असल्याने तुषार देशपांडेलाही खेळता आले नाही. त्यामुळे मुंबईकडे एक वेगवान गोलंदाज कमी होता. मी पाचही दिवस आजारी असेन, असे वाटले नव्हते. दोन दिवसांत बरा होईन अशी मला आशा होती. मात्र, तसे झाले नाही. परंतु संघाला जिंकवण्यासाठी मी सदैव आपले योगदान देत आलेलो आहे. मी यापूर्वीही असे केले आहे. गेल्या वर्षी आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यातही मी आजारी होतो. मात्र, त्यानंतरही मी गोलंदाजीत यश मिळवले होते. आता इराणी लढतीत माझी आणि सर्फराज खानची भागीदारी निर्णायक ठरली. संघाला इतक्या वर्षांनी जेतेपद मिळवून देण्यात माझा हातभार लागल्याने मी समाधानी आहे.’’
रणजी हंगाम दोन टप्प्यांत खेळविण्याच्या ‘बीसीसीआय’च्या निर्णयाचे शार्दूलने स्वागत केले. ‘‘हा निर्णय चांगला आहे. खेळाडू म्हणून तुम्ही कोणत्याही प्रारूपाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. यावेळी लाल चेंडूच्या प्रारूपानंतर तुम्हाला मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत आणि पुन्हा लाल चेंडूंच्या सामन्याकडे वळायचे आहे. याचा फायदा खेळाडूला भारत ‘अ’ किंवा नंतर भारताकडून खेळताना होईल. आंतरराष्ट्रीय सामने खेळताना भारतीय संघ विविध प्रारूपांत मालिका खेळतो. स्थानिक स्तरावर खेळाडूंना याची सवय झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे त्यांना थोडे सोपे होऊ शकेल,’’ असे शार्दूलला वाटते.