वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Ranji Trophy Cricket Tournament भारतीय निवड समितीकडून सतत दुर्लक्ष होत असूनही सर्फराज खानने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपला झंझावात कायम राखला आहे. सर्फराजच्या (१५५ चेंडूंत १२५ धावा) अप्रतिम खेळीच्या बळावर दिल्लीविरुद्ध मंगळवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडकातील ब-गटाच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात २९३ धावांची मजल मारली.
सलग तीन रणजी हंगामांमध्ये १०० हून अधिकच्या सरासरीने धावा करूनही सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीही सर्फराजचा भारतीय संघात समावेश नाही. त्यामुळे आपण खूप निराश असल्याचे सर्फराज म्हणाला होता. मात्र, याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही. दिल्लीविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमच्या अवघड खेळपट्टीवर त्याने हंगामातील तिसरे शतक साकारत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर मुंबईसाठी पृथ्वी शॉने आक्रमक सुरुवात केली. गेल्या सामन्यातील त्रिशतकवीर पृथ्वीने ३५ चेंडूंतच९ चौकारांच्या मदतीने ४० धावा फटकावल्या. त्याला दिवीज मेहराने बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर मध्यमगती गोलंदाज प्रांशू विजयरनने अरमान जाफर (२), मुशीर खान (१४) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (२) यांना झटपट माघारी पाठवल्याने मुंबईची ४ बाद ६६ अशी स्थिती झाली. यष्टिरक्षक-फलंदाज प्रसाद पवारने (२५) काही चांगले फटके मारले. मात्र, त्यालाही विजयरनने बाद केले. यानंतर सर्फराज आणि शम्स मुलानी (१०३ चेंडूंत ३९) यांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४४ धावांची भागीदारी रचली. सर्फराजने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना दिल्लीच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने चौफेर फटकेबाजी करताना १६ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील १३वे शतक साकारले. अखेर सर्फराज १२५ धावांवर बाद झाला. यानंतर तनुश कोटियन (नाबाद १७) वगळता मुंबईच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
’ मुंबई (पहिला डाव) : ७९.२ षटकांत सर्वबाद २९३ (सर्फराज खान १२५, पृथ्वी शॉ ४०, शम्स मुलानी ३९; प्रांशू विजयरन ४/६६)