नागपूर : सलामीवीर अथर्व तायडेच्या (१०९) शतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकविरुद्ध पहिल्या दिवसअखेरीस ३ बाद २६१ अशी आश्वासक सुरुवात केली.
कर्नाटकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर विदर्भाने सलामीवीर ध्रुव शोरीला (१२) झटपट गमावले. त्यानंतर अथर्व आणि यश राठोड यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १८४ धावांची भागीदारी करताना विदर्भाच्या डावाचा पाया रचला. अथर्वने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील तिसरे शतक साजरे केले. पण, यश शतकाला मुकला. तो ९३ धावांवर बाद झाला. यशने १५७ चेंडूंतील आपल्या खेळीत १२ चौकार लगावले. अखेरच्या सत्रात अथर्वही बाद झाला. त्याने आपली शतकी खेळी २४४ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकारासह केली.
अथर्व बाद झाल्यावर अनुभवी करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरने उर्वरित वेळ खेळून काढला. खेळ थांबला तेव्हा करुण ३०, तर अक्षय २ धावांवर खेळत होता.
हेही वाचा >>>AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
शतकवीर मुशीरने मुंबईला सावरले
युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर मुशीर खानने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. मुशीरने (२१६ चेंडूंत नाबाद १२८) साकारलेल्या झुंजार शतकामुळे बडोदाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या दिवसअखेर मुंबईला ५ बाद २४८ धावांची मजल मारता आली.
तमिळनाडूने सौराष्ट्राला गुंडाळले
कर्णधार आर. साई किशोरच्या (५/६६) प्रभावी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीमुळे तमिळनाडूने पहिल्या दिवशी गतविजेत्या सौराष्ट्राचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. सलामीचा फलंदाज हार्विक देसाई (८३) वगळता सौराष्ट्राचा एकही फलंदाज खेळपट्टीवर फार वेळ टिकू शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तमिळनाडूने १ बाद २३ धावा केल्या होत्या.
आंध्रच्या गोलंदाजांची चमक
के. व्ही. ससिकांत आणि नितिश रेड्डी या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे आंध्रने रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या दिवसअखेरीस मध्य प्रदेशचा पहिला डाव ९ बाद २३३ धावा असा मर्यादित ठेवला. ससिकांतने ३७ धावांत ४, तर नितिशने ५० धावांत ३ गडी बाद केले.