वृत्तसंस्था, नागपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डावखुरा यश राठोड (नाबाद ९७) आणि कर्णधार अक्षय वाडकर (७७) यांच्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशविरुद्ध दमदार पुनरागमन केले. सोमवारी, सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने दुसऱ्या डावात ६ बाद ३४३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे आता २६१ धावांची भक्कम आघाडी आहे.

पहिल्या डावातील पिछाडीनंतर विदर्भाने दुसऱ्या डावात जिद्दीने फलंदाजी केली. मधल्या फळीतील यश राठोडने १६५ चेंडूंत १२ चौकारांसह आपली नाबाद खेळी सजवली. त्याला कर्णधार अक्षय वाडकरने उत्तम साथ दिली. त्याने १३९ चेंडूंत आठ चौकारांसह ७७ धावांची खेळी केली. विदर्भाची ५ बाद १६१ धावा अशी स्थिती असताना ही जोडी एकत्र आली. त्यांनी सहाव्या गडय़ासाठी १५८ धावांची भागीदारी केली.

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवशी १ बाद १३ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केल्यावर सकाळच्या सत्रात झालेल्या दोन छोटय़ा भागीदारी विदर्भाचा डाव सावरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्या. ‘नाईट वॉचमन’ अक्षय वखरे दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर प्रथम ध्रुव शोरी (४०) आणि अमन मोखाडे (५९) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८४ धावांची भागीदारी केली. ध्रुव बाद झाल्यावर अमन आणि करुण नायर (३८) यांनी चौथ्या गडय़ासाठी ४७ धावा जोडल्या. इथूनच विदर्भाची आघाडी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, अमन आणि करुण पाठोपाठ बाद झाल्याने विदर्भ पुन्हा अडचणीत सापडण्याचा धोका होता. परंतु सातवाच प्रथमश्रेणी सामना खेळणारा यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी जबाबदारीने खेळ करून विदर्भाची बाजू भक्कम केली.

हेही वाचा >>>Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय

पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत खेळपट्टी आता अधिक सहज झाली आहे. खेळपट्टीवरील उसळीही कमी झाली आहे. याचा विदर्भाच्या जोडीने चांगला फायदा करून घेतला. याच मैदानावर यापूर्वी दोन वेळा अशाच पद्धतीने खेळपट्टीने तिसऱ्या दिवसानंतर आपले रुप बदलले होते. अचानक फिरकीला साथ मिळत होती. आता पुन्हा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

’ विदर्भ (पहिला डाव) : १७०

’ मध्य प्रदेश (पहिला डाव) : २५२

’ विदर्भ (दुसरा डाव) : ९० षटकांत ६ बाद ३४३ (यश राठोड नाबाद ९७, अक्षय वाडकर ७७, अमन मोखाडे ५९, ध्रुव शोरी ४०, अनुभव अगरवाल २/६८)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy cricket tournament madhya pradesh vs vidarbha sport news amy
Show comments