लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गतविजेत्या मुंबई संघाचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले असून आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत त्यांना तुलनेने दुबळ्या मेघालयाविरुद्ध मोठा विजय अनिवार्य आहे. त्याच वेळी मुंबईला बडोदा आणि जम्मू-काश्मीर यांच्यात होणाऱ्या अन्य लढतीकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे.

मुंबईच्या संघाला यंदाच्या रणजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने सहापैकी केवळ तीन सामने जिंकले असून दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना त्यांनी अनिर्णित राखला. गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर मुंबईला जम्मू-काश्मीरविरुद्ध अडीच दिवसांत मानहानिकारक हार पत्करावी लागली होती. मात्र, त्याच वेळी बडोद्याला महाराष्ट्राने पराभवाचा धक्का दिल्याने मुंबईच्या आशा कायम राहिल्या.

गेल्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात रोहित शर्मा, कर्णधार अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांसारख्या मातब्बरांचा समावेश होता. परंतु शार्दूल वगळता सर्व नामांकित खेळाडूंनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला आणि याचा त्यांच्या निव्वळ धावगतीला मोठा फटका बसला.

एलिट ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. जम्मू-काश्मीर आणि बडोदा हे संघ अव्वल दोन स्थानांवर असून बाद फेरी गाठण्यासाठी ते चांगल्या स्थितीत आहेत. या दोनही संघांचे भविष्य आपल्याच हाती आहे. मुंबईला मात्र विजय मिळविण्यासह अन्य दोन आघाडीच्या संघांच्या निकालावरही नजर ठेवावी लागणार आहे. त्यातच आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि त्याआधी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित, यशस्वी आणि श्रेयस यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांतीचा निर्णय घेतला असून मेघालयाविरुद्धच्या सामन्यासाठी ते उपलब्ध नसतील.

आंतरराष्ट्रीय ताऱ्यांच्या अनुपस्थितीत मुंबईला कर्णधार रहाणे, सिद्धेश लाड, शार्दूल, शम्स मुलानी, तनुष कोटियन या अनुभवी खेळाडूंसह संपूर्ण हंगामात प्रभावी कामगिरी करणारा युवा सलामीवीर आयुष म्हात्रेवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा सामना वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ अकादमीच्या मैदानावरच होणार असून वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरू शकेल. मेघालयाच्या संघाने यंदाच्या हंगामात सर्व सहा साखळी सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दडपण राखून बोनस गुणासह विजय मिळविण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

बाद फेरीचे समीकरण…

● रणजी स्पर्धेच्या एलिट ‘अ’ गटात सर्व संघांचे सहा सामने झाले असून जम्मू-काश्मीर (२९ गुण), बडोदा (२७ गुण) आणि मुंबई (२२ गुण) हे संघ अव्वल तीन स्थानांवर आहेत. या गटातून केवळ दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

● मुंबईने मेघालयाचा पराभव केल्यास त्यांचे २८ गुण होतील. तसेच बोनस गुण मिळविल्यास मुंबईचे २९ गुण होऊ शकतील. मात्र, त्याच वेळी मुंबईला अन्य दोन अव्वल संघांच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

● जम्मू-काश्मीर विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित राहिला व बडोद्याकडे पहिल्या डावाची आघाडी असल्यास हे दोन संघ आगेकूच करतील आणि मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल. जम्मूचा संघ विजयी ठरल्यास त्यांचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यांच्यासह मुंबई आगेकूच करेल.

● बडोद्याने जम्मू-काश्मीरला नमविल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. जम्मू-काश्मीर पराभूत होण्यासह मुंबईने बोनस गुणाने विजय मिळविल्यास दोन्ही संघांचे समान २९ गुण होतील. त्यानंतर सरस निव्वळ धावगती असणारा संघ आगेकूच करेल.

● जम्मू-काश्मीरची निव्वळ धावगती १.५९८ अशी, बडोद्याची १.३०१ अशी, तर मुंबईची १.३९७ अशी आहे. रणजी स्पर्धेत विजयासाठी सहा गुण, तर बोनस मिळाल्यास सात गुण दिले जातात. सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला तीन गुण आणि प्रतिस्पर्धी संघाला एक गुण दिला जातो.