कोलकाता : उपकर्णधार अर्पित वसावडाच्या (१५५ चेंडूंत नाबाद ८१ धावा) अर्धशतकी खेळीमुळे सौराष्ट्रने बंगालविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पकड मिळवली आहे. सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३१७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यामुळे पहिल्या डावात सौराष्ट्रकडे १४३ धावांची आघाडी आहे.
वसावडाने राजकोट येथे झालेल्या २०२०च्या हंगामातील अंतिम सामन्यात १०६ धावांची खेळी करताना सौराष्ट्रला पहिल्या डावात निर्णायक आघाडी मिळवून दिली होती. आता पुन्हा त्याच्या खेळीमुळेच बंगालचा संघ अडचणीत सापडला आहे. वसावडाने शेल्डन जॅक्सन (५९) आणि चिराग जानी (नाबाद ५७) यांच्यासह निर्णायक भागीदाऱ्या रचल्या. वसावडा व जानी यांनी सहाव्या गडय़ासाठी ११३ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे आहे. उपांत्य फेरीत कर्नाटकविरुद्ध द्विशतकी खेळी करणाऱ्या वसावडाने आपली लय कायम राखली. त्याने आतापर्यंत ११ चौकार मारले आहेत.
वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर बंगालच्या गोलंदाजांनी निराशा केली. त्यांना सकाळच्या सत्रात पहिला गडी बाद करण्यासाठी बराच काळ लागला. सलामीवीर हार्विक देसाईने (५० धावा) ‘नाइट वॉचमन’ चेतन सकारियासह (८) खेळताना आपले अर्धशतक झळकावले. मुकेश कुमारने देसाईला बाद केले.