वृत्तसंस्था, मुंबई
वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे (५/३७) आणि डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (३/३३) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटाच्या सामन्यात तमिळनाडूचा पहिला डाव १४४ धावांवरच संपुष्टात आणला. मुंबईच्या फलंदाजांनाही धावांसाठी झगडावे लागले. मात्र, पहिल्या दिवसअखेर मुंबईची ६ बाद १८३ अशी धावसंख्या होती. मुंबईकडे पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी होती.
हेही वाचा >>>IPL 2023 मधून बाहेर पडूनही ऋषभ पंतला मिळणार पूर्ण वेतन; डीसी नव्हे तर बीसीसीआय देणार पैसे, जाणून घ्या कारण
मंगळवारपासून मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. तुषार आणि मोहित अवस्थी (१/३४) या वेगवान गोलंदाजांनी तमिळनाडूच्या आघाडीच्या फळीला अडचणीत टाकले. मग मुलानीचा प्रतिकार करण्यातही तमिळनाडूचे फलंदाज अपयशी ठरले. तमिळनाडूच्या प्रदोष रंजन पॉल (७५ चेंडूंत ५५) आणि नारायण जगदीशन (३७ चेंडूंत २३) या दोनच फलंदाजांना २० धावांचा टप्पा ओलांडता आला.
हेही वाचा >>>VIDEO: मोठे शॉट्स खेळण्यासाठी सूर्यकुमार ‘या’ खेळाडूची करतो कॉपी; स्वत: केला खुलासा
यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईने यशस्वी जैस्वाल (०) आणि अरमान जाफर (४) यांना झटपट गमावले. परंतु सलामीवीर पृथ्वी शॉ (३३ चेंडूंत ३५) आणि कर्णधार रहाणे (४३ चेंडूंत ४२) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत ९ षटकांत ६७ धावांची भागीदारी रचली. मध्यमगती गोलंदाज अश्विन क्रिस्टने या दोघांनाही माघारी पाठवल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला. मग सर्फराज खानने (७६ चेंडूंत नाबाद ४६) एक बाजू लावून धरताना हार्दिक तामोरे (१०) आणि मुलानी (२८) यांच्या साथीने मुंबईला आघाडी मिळवून दिली.
(तुषार देशपांडे)