रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२१-२०२२ या हंगामाचा आज समारोप झाला. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने मुंबईच्या संघावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशने ४१वेळच्या विजेत्या मुंबईचा सहा गडी राखून परावभव केला. रणजी स्पर्धेच्या इतिहासामध्ये मध्य प्रदेशने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे विजेत्या संघावर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षावर सुरू केला आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे.

शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे मध्य प्रदेशच्या संघाने २९.५ षटकांतच पूर्ण केले. यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार हे मध्य प्रदेशच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सामना अंतिम टप्प्यात आल्यापासून मुख्यमंत्री सामन्याकडे लक्ष ठेवून होते. आपल्या संघाने विजय मिळवताच चौहान यांनी हेलिकॉप्टरमध्ये जल्लोष केला.

या विजयाबद्दल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे. “रणजी करंडक २०२२च्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने केवळ नेत्रदीपक विजयच मिळवला नाही, तर लोकांची मनेही जिंकली. या अभूतपूर्व विजयाबद्दल मध्य प्रदेश संघाचे हार्दिक अभिनंदन. तुमची ही विजयी घोडदौर अशीच अखंडपणे सुरू राहो, यासाठी शुभेच्छा,” असे ट्वीट त्यांनी केले आहे. याशिवाय, त्यांनी आणखी एक ट्वीट करून कर्णधार, प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाचे राज्यात जंगी स्वागत होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील ट्वीट करून विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे. “मध्यप्रदेशच्या संघाने पहल्यांदाच रणजी करंडक जिंकून इतिहास रचला आहे. या नेत्रदीपक विजयासाठी मध्यप्रदेशच्या संघाचा अभिमान आहे. सर्व खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा”, असे ट्वीट कमलनाथ यांनी केले आहे.

Story img Loader