MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले आहे. अंतिम सामन्यात शतक साजरे केल्यानंतर सर्फराजने अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता. शतक साजरे करताना २३ वर्षीय फलंदाज हेल्मेट काढताना रडताना दिसला. त्यानंतर त्याने शिखर धवन-स्टाईलने शड्डू ठोकून आनंद साजरा केला. या वर्षाच्या रणजी हंगामातील हे त्याचे चौथे आणि प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्फराजने शतक पूर्ण केलेल्या क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर सर्फराज ४० धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी डावाची सुरुवात केल्यानंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यासाठी त्याने १५२ चेंडू घेतले. या दरम्यान मुंबईच्या फलंदाजीची पडझड सुरू होती. त्यामुळे संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्यासाठी सर्फराजने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत पुढील पन्नास धावांचा टप्पा पार करून शतक साजरे केले.

हेही वाचा – Rohit Sharma Emotional Note : ‘या’ कारणामुळे रोहित शर्माने चाहत्यांसाठी लिहिली भावनिक पोस्ट

मुंबईचा फलंदाज सर्फराज खान यंदाच्या रणजी करंडकामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेतील शेवटच्या तीन साखळी सामन्यांमध्ये १६५, ६३, ४८ अशा केल्या होत्या. शिवाय, मुंबई विरुद्ध उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही त्याने १५४ धावा केल्या होत्या. गेल्या रणजी हंगामात त्याने एकूण ९२८ धावा केल्या होत्या. प्रत्‍येक प्रथम श्रेणीतील शतकामध्ये १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या हंगामामध्येदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.