आत्मविश्वास, प्रयत्नांमधील सातत्य आणि सकारात्मक दृष्टी यांमुळे विदर्भ संघाने रणजी करंडक जिंकून दाखवला. ही नेत्रदीपक कामगिरी करुन त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण केलं आहे.
रणजी, दुलीप, देवधर, मुश्ताक अली चषक स्पर्धा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी असलेली दारे समजली जातात. या स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करीत भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आपले नाणे खणखणीत करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करीत असतो. रणजी स्पर्धेत विदर्भ संघ अजिंक्यपद मिळवील असे कोणी स्वप्नही पाहिले नसेल. खुद्द त्यांच्यासाठी अंतिम फेरीतील प्रवेशही अनपेक्षित होता. तथापि सांघिक कौशल्यास आत्मविश्वास व सकारात्मक वृत्तीची जोड दिली तर कोणत्याही गोष्टी शक्य होतात, हेच विदर्भ संघाने रणजी करंडक जिंकून दाखवून दिले.
मुंबई, कर्नाटक, दिल्ली आदी संघ रणजी स्पर्धेत हुकुमत गाजविणारे संघ मानले जातात. या संघांना मागे टाकून विदर्भ संघाने क्रिकेट पंडितांना धक्का देणारी कामगिरी केली आहे. साखळी गटात विदर्भ संघाने पंजाब, सेनादल, बंगाल, गोवा या संघांविरुद्ध शानदार विजय मिळविला. साखळी गटात त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. बाद फेरीत त्यांनी केरळ संघाचा चारशेहून अधिक धावांनी पराभव केला. तेथेच त्यांच्या विजेतेपदाचा पाया रचला गेला असे म्हणता येईल. उपांत्य फेरीत विदर्भापुढे कर्नाटकचे आव्हान होते. रणजी, इराणी आदी अनेक स्पर्धामध्ये विजेत्या असलेल्या कर्नाटक संघापुढे विदर्भचा संघ अगदीच दुबळा संघ मानला जात होता. मात्र कधीतरी एखादी मुंगीदेखील हत्तीचा पाडाव करू शकते हा आत्मविश्वास विदर्भ संघाच्या खेळाडूंमध्ये होता. कर्नाटक संघात करुण नायर, विनयकुमार, अभिमन्यू मिथुन, सी. के. गौतम आदी अनेक नावाजलेले खेळाडू होते. तरीही त्यांना पराभूत करण्यात विदर्भ संघास यश मिळाले. विदर्भ संघ पहिल्या डावात ११६ धावांनी पिछाडीवर होता. त्या वेळी पहिल्या डावाच्या आघाडीवर हा सामना कर्नाटकच्या खिशात होता. मात्र विदर्भ संघाच्या खेळाडूंनी जिद्द सोडली नाही. त्यांनी शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रापर्यंत झुंजार खेळ करीत पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. अंतिम फेरीत दिल्ली संघापुढे विदर्भ संघ टिकणार नाही अशीच सर्वाना खात्री होती. दिल्ली संघात गौतम गंभीर, ऋषभ पंत, नितीश राणा, ध्रुव शौरी, नवदीप सैनी आदी कितीतरी वलयांकित खेळाडू होते. अंतिम फेरीत प्रथमच उतरलेल्या विदर्भ संघाने आता अजिंक्यपद मिळविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवीत सर्वच आघाडय़ांवर प्रभावी कामगिरी केली. पहिल्या डावातच पाचशे धावांचा डोंगर रचून त्यांनी २५२ धावांची खणखणीत आघाडी मिळविली. तेथेच त्यांचे विजेतेपद निश्चित झाले होते. मात्र निर्णायक विजय मिळवीतच रणजी करंडकवर नाव कोरायचे या हेतूने विदर्भ संघाचे खेळाडू लढले व ऐतिहासिक कामगिरी केली.
खरंतर विदर्भ संघाकडे वासिम जाफरचा अपवाद वगळता अन्य कोणताही वलयांकित खेळाडू नाही. तसेच त्यांचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हेदेखील उपेक्षितच प्रशिक्षक मानले जातात. पंडित व प्रौढ खेळाडू जाफर हे मूळचे मुंबई संघाशी निगडित असलेले. तथापि मुंबई संघात स्थान मिळविण्यासाठी व त्या संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्यासाठी उत्सुक असलेल्यांची मुंबईत कमतरता नाही. वयाचा विचार करता आपल्याला मुंबई संघात स्थान टिकविणे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर जाफर याने विदर्भ संघाचा रस्ता स्वीकारला. त्याचप्रमाणे कर्नाटकचा गणेश सतीश यानेही तोच मार्ग पत्करला. कर्नाटक संघातच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खेळायचे स्वप्न साकार करण्यासाठी गणेश सतीश याने कर्नाटकला रामराम ठोकला व विदर्भ संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
खेळाडूंमध्ये उत्तम संवाद
विदर्भ संघासाठी जाफर व सतीश हे उपरेच खेळाडू होते. तरीही संघातील अन्य खेळाडूंनी तसे जाणवू दिले नाही. तसेच कर्णधार फैज फाजल, जाफर हे प्रौढ खेळाडू असूनही त्यांच्या सहकाऱ्यांनी कधीही त्यांचा दुस्वास केला नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे त्यामध्ये सर्वोत्तम यश मिळवायचे असेल तर सांघिक कौशल्य महत्त्वाचे आहे याची जाणीव विदर्भ संघाच्या खेळाडूंमध्ये दिसली. अनुभवी व युवा खेळाडू असा समतोल त्यांच्याकडे होता. फाजल याला केवळ झिम्बाब्वे दौऱ्यात स्थान मिळाले होते. अन्य संघांइतका वलयांकित खेळाडूंचा ताफा त्यांच्याकडे नाही. तरीही एकमेकांवर विश्वास दाखविला तर अशक्य गोष्टही शक्य होते हा त्यांच्याकडे आत्मविश्वास होता. एखादा सहकारी अपयशी ठरला तरी त्याला नाउमेद न करता त्याच्याकडून पुन्हा कशी सर्वोच्च कामगिरी करता येईल असेच प्रोत्साहन संघातील इतर खेळाडू त्याला देत असत. हीच विदर्भ संघासाठी मोठी गोष्ट होती.
गुरबानीची ऐतिहासिक कामगिरी
विदर्भ संघाचा द्रुतगती गोलंदाज रजनीश गुरबानी याने अंतिम फेरीत पहिल्या डावात हॅट्ट्रिक नोंदवीत ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने हे तीनही बळी त्रिफळा उडवीतच मिळविले. त्याने या हॅट्ट्रिकसह सहा बळी घेत सात वेळा रणजी विजेत्या दिल्ली संघाचा पहिला डाव २९५ धावांमध्ये गुंडाळला व तेथेच आपल्या संघाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्याबरोबरच अक्षय वाखरे, अक्षय कर्णेवार, सुमीत रुईकर यांनीही गोलंदाजीत सातत्य दाखविले. फलंदाजीत सतीश, जाफर, फाजल, अक्षय वाखरे, आदित्य सरवटे, कर्ण शर्मा, संजय रामस्वामी आदी खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडविला. ज्या वेळी आक्रमक खेळाची गरज आहे, त्या वेळी त्यांनी चौफेर फटकेबाजीस प्राधान्य दिले. ज्यावेळी खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करण्याची गरज होती, त्या वेळी त्यानुसार त्यांनी व्यूहरचना करीत खेळ केला. क्षेत्ररक्षणातही त्यांनी झोकून देत कामगिरी केली. कॅचेस विन मॅचेस हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवीत त्यांनी शक्यतो क्षेत्ररक्षणातील चुका कशा टाळल्या जातील याचाच विचार केला व त्यानुसार प्राधान्य दिले.
प्रशिक्षकांशी अतूट नाते
कोणत्याही खेळाडूच्या यशात त्याच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा असतो. विदर्भ संघाच्या विजेतेपदामध्ये त्यांचे प्रशिक्षक पंडित तसेच अन्य सपोर्ट स्टाफ आणि अर्थातच विदर्भ क्रिकेट संघटनेचाही मोठा वाटा आहे. खेळाडू व प्रशिक्षक यांचा एकमेकांवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. पंडित व संघातील खेळाडूंमध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना व टिपणी आपल्या हिताचीच आहे असे मानणे खेळाडूंसाठी हितावह असते. विदर्भ संघातील खेळाडूंनीही पंडितसरांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले.
विदर्भ संघाने विजेतेपद मिळवीत त्यांच्या प्रदेशासाठी खूप सकारात्मक प्रवाह निर्माण केला आहे. आत्मविश्वासाला कष्टाची साथ दिली तर सर्वोच्च यश मिळविता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. क्रिकेट क्षेत्रात त्यांची मोठी भावंडे असलेल्या मुंबई व महाराष्ट्र या संघांमधील खेळाडूंना त्यांच्याकडून बरेच काही शिकावयास मिळणार आहे. वलयांकित खेळाडू नसलो तरी आपण यशाचे शिखर गाठू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. क्रिकेटमध्ये मिळविलेल्या सर्वोच्च यशापासून प्रेरणा घेत विदर्भातील अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंनीही प्रेरणा घेतली पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी कशी करता येते हे विदर्भ क्रिकेट संघाकडून अन्य सर्वच राज्याच्या खेळाडूंनी शिकले पाहिजे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा