भारतीय संघाचा रनमशीन विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी परतला होता. मात्र, कोहली पुनरागमन च्या या सामन्यात अपयशी ठरला. तो केवळ १५ चेंडूवर ६ धावा करत तो बाद झाला, या खेळीदरम्यान त्याने एक दणदणीत चौकारही लगावला. रेल्वेच्या हिमांशू सांगवानने विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत त्याच्या मोठ्या खेळीचं स्वप्न धुळीस मिळवलं. विराट कोहलीला बाद करण्याचा सल्ला सामन्यापूर्वी बस ड्रायव्हरने दिला असल्याचे हिमांशू सांगवानने सांगितले.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना हिमांशू सांगवान म्हणाला की, कोहलीविरुद्ध खेळण्यासाठी रेल्वेचा संघ खूप उत्सुक होता. विराट कोहलीच्या आयकॉनिक विकेटबाबत बोतलाना हिमांशूने सांगितलं की, “सामन्यापूर्वी विराट कोहली आणि ऋषभ पंत दिल्लीकडून खेळणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी आम्हाला माहित नव्हते की या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. नंतर आम्हाला कळलं की ऋषभ पंत खेळणार नाहीय, पण विराट कोहली सामना खेळणार आहे आणि हा सामना लाईव्ह दिसणार आहे. मी रेल्वे संघाच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्त्व करणार होतो. संघातील प्रत्येकाला वाटतं होतं मी विराट कोहलीला आऊट करावं.
पुढे सांगताना हिमांशू म्हणाला, आम्ही ज्या बसने प्रवास करत होतो, त्या बस ड्रायव्हरनेही मला सांगितले की तुलाही माहिती आहे की तुला चौथ्या-पाचव्या स्टंप लाइनवर विराट कोहलीला गोलंदाजी करायची आहे, आणि मग तो बाद होईल. माझ्यात आत्मविश्वास होता. मला इतर कोणाच्याही कमकुवत बाजूंपेक्षा माझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे होते. मी माझ्या ताकदीनुसार गोलंदाजी केली आणि विकेट मिळवली.”
हिमांशू पुढे म्हणाला, ‘विराट कोहलीसाठी कोणतीही विशेष रणनिती आखली नव्हती. दिल्लीच्या खेळाडूंना आक्रमक क्रिकेट खेळायला आवडते, असे प्रशिक्षकाने सांगितले. ते सर्व स्ट्रोक खेळणारे खेळाडू आहेत. आम्हाला योग्य लेंग्थवर गोलंदाजी करण्यास सांगितले होते.”
हिमांशूने सामन्यानंतर कोहलीबरोबर झालेल्या भेटीबाबतही सांगितले. तो म्हणाला, ‘जेव्हा आमचा डाव संपला तेव्हा मी ड्रेसिंग रुममध्ये जात होतो आणि विराट कोहली मैदानावर येत होता. आयुष बडोनी आणि विराट तिथे होते. विराट भाईने स्वतः मला हात मिळवला आणि मला म्हणाला की चांगली गोलंदाजी केली. मी चांगली गोलंदाजी करत असल्याचे त्यांनी मला सांगितले. मग मी त्याला म्हणालो की मला लंच ब्रेकमध्ये त्याच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे.
हिमांशूने भेटीबाबत सांगताना पुढे सांगितलं, त्यानंतर मी दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो. मी त्याला क्लीन बोल्ड केलं होतो तोच चेंडू घेऊन गेलो होतो. इतकंच काय तर त्याने मला विचारल देखील की हा तोच चेंडू आहे का? आणि मग म्हणाला, ‘ओहह तेरी मजा आ गया तुझे तो’
रणजी सामन्यात विराटला बाद केल्यानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं हिमांशूने सांगितलं. हिमांशूचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट होतं पण त्यानंतर आता त्याला मिळालेल्या प्रेमानंतर त्याने हे अकाऊंट ओपन ठेवलं आहे.