करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५१ अशी मजल मारली आहे. त्यांच्याकडे ८१ धावांची आघाडी आहे. पंजाबला २७० धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकची २ बाद ३९ अशी अवस्था झाली होती. रॉबिन उथप्पा स्थिरावलाय असे वाटत असतानाच हरभजन सिंगने त्याला बाद केले. त्याने ४७ धावा केल्या. यानंतर मनीष पांडे आणि करुण नायर जोडीने ६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. शतकाकडे कूच करणाऱ्या मनीष पांडेला संदीप शर्माने बाद करीत पंजाबला यश मिळवून दिले. पांडेने ६ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. करुण नायरने मुरलीधरन गौतमच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. हरभजन सिंगनेच ही जोडी फोडली. गौतमने ७ चौकारांसह ४८ धावा केल्या. यानंतर अमित वर्माने करुणला चांगली साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ११० धावांची अभेद्य भागीदारी रचत कर्नाटकला आघाडी मिळवून दिली. या दरम्यान करुणने आपले शतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा करुण नायर १०७ तर अमित वर्मा ६५ धावांवर खेळत आहे. पंजाबतर्फे हरभजन सिंगने सर्वाधिक २ बळी टिपले.
करुण नायरचे शतक, कर्नाटकला आघाडी
करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५१ अशी मजल मारली आहे.
First published on: 21-01-2014 at 04:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy karnataka seize control of semi final with first innings lead over punjab