कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण रणजी साखळी सामन्यामध्ये मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भेदक आणि अचूक मारा करत कर्नाटकने सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी मुंबईवर १६० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
यापूर्वी कर्नाटकला एकदाही मुंबईवर विजय मिळवता आला नव्हता. गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमात दमदार सुरुवात करूनही त्यांच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा काहीशा धूसर दिसत आहेत. कारण कर्नाटक (३२ गुण) बाद फेरीत पोहोचला असून, दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा (२६ गुण) संघ आहे, तर मुंबईची (२३ गुण) तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. याचप्रमाणे पंजाबचा संघ (२३ गुण) चौथ्या स्थानावर असून त्यांचा अखेरचा सामना झारखंडशी आहे. मुंबईचा अखेरचा सामना गुजरातशी असून त्यांनी या सामन्यात विजय मिळवला तरच त्यांच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम राहतील. कारण पंजाबने जर झारखंडवर विजय मिळवला तर मुंबईसाठी पहिल्या डावाची आघाडी काही कामाची नसेल आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पंजाबची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास ते झारखंडवर विजय मिळवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला तरच त्यांचे या स्पर्धेतील आव्हान टिकू शकेल.
कर्नाटकने मुंबईपुढे विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते, पण मुंबईच्या फलंदाजांनी कच खाल्ल्यामुळे त्यांना पहिल्या डावाची आघाडी कायम राखता आली नाहीच, पण सामनाही गमवावा लागला. मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांची ४ बाद ५० धावा अशी अवस्था झाली. मुंबईकडून हिकेन शाह (२८) आणि सिद्धेश लाड (२४) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. कर्नाटकच्या आर. विनय कुमार आणि एच. एस. शरथ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले आणि मुंबईचा १२१ धावांत खुर्दा उडवला.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : २५१
मुंबई (पहिला डाव) : २६९
कर्नाटक (दुसरा डाव) : २९९
मुंबई (दुसरा डाव) : ५१.३ षटकांत सर्व बाद १२१ (हिकेन शाह २८, सिद्धेश लाड २४; आर. विनय कुमार ३/३२, एच. एस. शरथ ३/१२)
*  निकाल : मुंबईचा १६० धावांनी पराभव
*  गुण : कर्नाटक : ६, मुंबई : ०.

Story img Loader