Ranji Trophy 2025 Mumbai vs Baroda Match Updates: रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आजपासून म्हणजेच २३ जानेवारीपासून एलिट संघाचे सामने सुरू झाले आहेत. विविध ठिकाणी १७ सामने सुरू असून या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे अनेक खेळाडू आहेत. पण रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि शुबमन गिल एकेरी धावेवर तंबूत परतले आहेत. यादरम्यान महाराष्ट्र विरूद्ध बडोदा सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी महाराष्ट्रचा मधल्या फळीतील फलंदाज अंकित बावणेवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकित बावणेला मैदानावरील पंचांशी असहमती दर्शवल्याबद्दल एका सामन्याचे निलंबन देण्यात आले आहे. नाशिकमध्ये बडोदा विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीच्या अ गटातील सामन्यापूर्वी संघाला या निर्णयाची माहिती देण्यात आली. व्हाईट-बॉल हंगामापूर्वी सर्व्हिसेसविरुद्धच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात बाद झाल्यानंतर बावणेने मैदान सोडण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली होती.

सव्हिर्सेस विरूद्ध महाराष्ट्रच्या त्या सामन्यात अंकित बावणे स्टॅन्ड इन कर्णधार होता. अंकित बावणे त्याच्या या विकेटवर रिव्ह्यू घेऊ शकला नाही, कारण सामना फक्त लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होता आणि टीव्हीवर त्या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू नव्हतं, याचा अर्थ DRS साठी कोणतीही सुविधा नव्हती. यानंतर त्याने मैदान सोडण्यास नकार दिल्यामुळे सुमारे १५ मिनिटं सामना थांबवण्यात आला, त्यानंतर सामनाधिकारी अमित शर्मा आणि महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या मध्यस्थीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला.

या घटनेनंतर कुलकर्णी यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील अंपायरिंगच्या मानकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले होते की खेळाडूंच्या वर्तनासाठी दंड आकारला जातो, पण पंचांच्या योग्य मूल्यमापनाचे काय? त्याच चुका करणारे पंच अंपायरिंग करून खेळ खराब का करत राहतात? जेव्हा अशा चुका वारंवार होतात तेव्हा राग येणं स्वाभाविक आहे.

ऋतुराज गायकवाडने पोस्ट करत पंचांना सुनावलं होतं

महाराष्ट्र संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही अंकित बावणेच्या विकेटचा व्हीडिओ पोस्ट करत पंचांना सुनावलं होतं. गायकवाड त्यावेळी ऑस्ट्रेलियात भारत अ संघाकडून खेळत होता. या मोसमात महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा बावणे हा पाच सामन्यांत ५१.५७ च्या सरासरीने ३६१ धावा करणारा खेळाडू आहे. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy maharashtra ankit bawne handed one match ban after refusing to leave the field against services bdg