गोविंदाग्रजांचे ‘राकट देशा, कणखर देशा..’ हे बोल शनिवारी महाराष्ट्राच्या संघाने सार्थ ठरवले. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमवर ‘खडूस’ मुंबईचे गर्वहरण केल्यानंतर ‘जय महाराष्ट्र’चे नाद घुमू लागले. यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या केदार जाधवने विजय झोलच्या साथीने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक विजयाचा अध्याय लिहिला. जाधवने मुंबईच्या वेगवान माऱ्याचा जिद्दीने सामना करीत दमदार शतक झळकावले, तर झोलने अर्धशतकी खेळी साकारली. महाराष्ट्राने आठ विकेट राखून दणदणीत विजय संपादन करीत रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तर गतविजेत्या आणि तब्बल चाळीस वेळा रणजी विजेत्या मुंबईची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. त्यामुळेच विजयानंतर महाराष्ट्राच्या ड्रेसिंगरूममध्ये अविरत जल्लोष सुरू होता, तर मुंबईकडे सन्नाटा पसरला होता.
शुक्रवारी चिराग खुराणाचा बळी मिळविणाऱ्या झहीर खानने शनिवारी सकाळच्या सत्रात हर्षद खडिवालेचा (१०) बळी मिळवत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यामुळे २ बाद ३७ अशी महाराष्ट्राची अवस्था झाल्यानंतर प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची करामतीची अपेक्षा सत्यात उतरेल, असे भासत होते. मग विजय झोल ३ धावांवर असताना अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर कौस्तुभ पवारने त्याचा झेल सोडला आणि तोच मुंबईला महागात पडला. कारण महाराष्ट्राच्या धावफलकावर त्यावेळी फक्त ४५ धावा झळकल्या होत्या. त्यानंतर तिसरा बळी मिळवण्यासाठी मुंबईने जंग जंग पछाडले, पण जाधव आणि झोल यांच्या चिवट झुंजीपुढे मुंबईकर गोलंदाजांचे काहीच चालले नाही.
हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा मुंबईचा कर्णधार झहीर खानला अनुकूल ठरावा यासाठी रचण्यात आला होता. परंतु सकाळच्या सत्रातील पहिला बळी मिळवल्यानंतर त्याच्या गोलंदाजीची जाधव आणि झोल यांनी तमा बाळगली नाही. झहीरने एण्ड बदलून आपल्या भात्यातील अनेक अस्त्रे टाकून पाहिली, पण त्याचा अजिबात उपयोग झाला नाही.
यंदाच्या रणजी हंगामात जाधवने आपले पाचवे शतक साकारताना १४४ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२० धावा केल्या आणि हंगामातील एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर भारताला आशिया चषक जिंकून देण्याची किमया साधणाऱ्या झोलने ११८ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ९१ धावा केल्या. जाधव आणि झोल जोडीने २३९ मिनिटे किल्ला लढवून ३१५ चेंडूंत २१५ धावांची अभेद्य भागीदारी केली.
मुंबई आणि महाराष्ट्राची रणजी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ६२ वेळा गाठ पडली. यापैकी १६ वेळा मुंबईने बाजी मारली असली तरी महाराष्ट्राने तिसऱ्यांदा मुंबईला हरवण्याचे कर्तृत्व दाखवले. २००५-०६ मध्ये महाराष्ट्राने वानखेडे स्टेडियमवरच मुंबईला हरवण्याची किमया साधली होती. त्याचीच पुनरावृत्ती करताना आता महाराष्ट्राने १९९२-९३ नंतर पुन्हा रणजी स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
महाराष्ट्राच्या संघाला
माधव मंत्री यांची शाबासकी
वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाला भारताचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांनी शाबासकी दिली. एके काळी मुंबईचे कर्णधारपद भूषवणाऱ्या माधव मंत्री यांनी चारही दिवस या सामन्याला हजेरी लावली होती. सामना संपल्यावर महाराष्ट्राच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४०२
महाराष्ट्र (पहिला डाव) : २८०
मुंबई (दुसरा डाव) : १२९
महाराष्ट्र (दुसरा डाव) : ६५.१ षटकांत २ बाद २५२ (विजय झोल नाबाद ९१ , केदार जाधव नाबाद १२०; झहीर खान २/५१)
पराक्रमी महाराष्ट्राच्या खेळाडूंना सलाम -सुरेंद्र भावे
मुंबई : ‘‘मुंबईला मुंबईत हरवणे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बाद फेरीत या बलाढय़ संघाला हरवणे, हे गौरवास्पद आहे. यशाचे हे सारे श्रेय सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंना जाते. वेगवान खेळपट्टीवर पहिल्या डावात ते पिछाडीवर पडले होते. परंतु मनाशी मात्र सकारात्मक खूणगाठ त्यांनी बांधली होती. मुंबईत हा पराक्रम दाखवण्यासाठी सिंहाचे काळीज लागते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या खेळाडूंना मी मनापासून सलाम करतो,’’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी व्यक्त केली.
हा पराभव सर्वानाच विचार करायला लावणारा -कुलकर्णी
मुंबई : ‘‘मुंबई हा स्थानिक क्रिकेटमध्ये अजिंक्यवीर संघ आहे. त्यामुळे विजेतेपदाशिवाय मुंबईला पर्यायच नसतो. त्यामुळे जेव्हा मुंबईचा संघ हरतो, तेव्हा ती फार मोठी घटना असते. हा पराभव सर्वानाच विचार करायला लावणारा आहे,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘मुंबईच्या क्रिकेटमध्ये प्रगती करायचे असेल तर ज्या-ज्या वयोगटातील क्रिकेट खेळले जाते आणि प्राथमिक क्रिकेटचे धडे दिले जातात. त्या क्रिकेटमध्ये लक्ष देण्याची वेळ आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.
रणजी वृत्तांत
कर्नाटकचा उ. प्रदेशवर विजय
बंगळुरू : श्रेयस गोपाळने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कर्नाटकने उत्तर प्रदेशला ९२ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. त्यांना आता पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पंजाबने बडोदा येथे झालेल्या लढतीत जम्मू व काश्मीर संघावर १०० धावांनी मात केली. बंगळुरू येथील लढतीत विजयासाठी ३३३ धावांचे आव्हानास सामोरे जाताना उत्तर प्रदेशचा दुसरा डाव ६५.३ षटकांत २४० धावांमध्ये आटोपला. कर्नाटकच्या श्रेयस गोपाळने ५९ धावांमध्ये पाच बळी घेतले.
पंजाबचा १०० धावांनी विजय
बडोदा : विजयासाठी ३२४ धावांचे लक्ष्य सामोरे असताना जम्मू व काश्मीर संघाचा दुसरा डाव २२३ धावांमध्ये कोसळला. पंजाबच्या व्ही.आर.व्ही.सिंग याने ४३ धावांमध्ये पाच बळी घेतले. जम्मू संघाच्या हरदीपसिंग याने नाबाद ७६ धावा करीत एकाकी लढत दिली.
रेल्वेला विजयाची संधी
कोलकाता : पश्चिम बंगालविरुद्धच्या उपांत्य पूर्व लढतीत रेल्वेला विजयाची संधी निर्माण झाली आहे. विजयासाठी २७१ धावांचे आव्हानास सामोरे जाताना त्यांनी दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ११७ धावा केल्या. त्याआधी वृद्धीमान साहा (८१) व लक्ष्मीरतन शुक्ला (७६) यांच्या शैलीदार खेळामुळे बंगालला दुसऱ्या डावात २६७ धावांपर्यंत मजल मारता आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा