भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी. त्यामुळेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी या दोन्ही प्रतिस्पध्र्यामध्ये जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. तब्बल ४० वेळा रणजी करंडक खात्यावर असलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामात प्रारंभ तर झोकात केला, परंतु नंतर मात्र त्यांना झगडायला लागले. अखेरच्या साखळी सामन्यात आपल्या ‘खडूस’ वृत्तीचे दर्शन घडवल्यामुळे बाद फेरीत पोहोचता आले. पण आता बेसावध राहून चालणार नाही. बुधवारपासून वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबईपुढे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान आहे ते महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचा संघ ‘क’ गटातून गटविजेत्याच्या आविर्भावात बाद फेरीत आल्यामुळे मुंबईच्या संघाने त्यांना कमी लेखून चालणार नाही.
मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने ९९ धावांची आघाडी घेतली होती. परंतु मुंबईने दुसऱ्या डावात आश्चर्यकारक निर्णायक विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्लाच्या कामगिरीमुळे मुंबईला आपला लौकिक राखता आला. अब्दुल्लाने एकंदर ११ बळी (४२ धावांत ६ बळी आणि ४४ धावांत ५ बळी) घेतले. या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या विशाल दाभोळकरने (३८ बळी) त्याला छान साथ दिली.
रणजी जेतेपदाच्या शर्यतीत आता उरलेल्या आठ संघांपैकी महाराष्ट्राचा संघ तसे पाहिल्यास सर्वात दुबळा म्हणता येईल. दुसरीकडे वेगवान गोलंदाज झहीर खान, अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर संघात परतल्यामुळे मुंबई अधिक समर्थपणे मुकाबल्यास सज्ज झाली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना कर्णधार झहीर खानला काही सामन्यांना मुकावे लागले होते. परंतु झहीर महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असल्यामुळे मुंबईचा गोलंदाजीचा मारा अधिक बळकट झाला आहे. पहिले दोन दिवस मुंबईची खेळपट्टी ही उसळी मारते आणि वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देते. त्यामुळे झहीर, शार्दूल ठाकूर (२१ बळी) आणि जावेद खान (२२ बळी) या वेगवान गोलंदाजांसमोर महाराष्ट्राचा कस लागेल.
सलामीवीर हर्षद खडीवाले, केदार जाधव, अंकित बावणे, कर्णधार-यष्टीरक्षक रोहित मोटवानी आणि भारताच्या युवा संघाचा कर्णधार विजय झोल हे महाराष्ट्राच्या फलंदाजीच्या फळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या हंगामाच्या प्रारंभात झोलने शतक झळकावले होते, तर नुकतेच आशिया चषकावर नाव कोरताना पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने शतक केले. सुदैवाने दुखापतीतून तो सावरला असून, मुंबईविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार आहे.
मुंबईची फलंदाजी या हंगामात आपल्या दर्जाला साजेशी दिसली नाही. अनुभवी फलंदाज वसिम जाफर आणि यष्टीरक्षक आदित्य तरे यांनी मात्र सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताकडून खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली. नायर मागील हंगामाइतका आपली छाप पाडू शकलेला नाही. सूर्यकुमार यादव दडपणाखाली खराब फटके खेळून बाद झाल्याचे अनेकदा दिसून आले. याशिवाय हिकेन शाह आणि सिद्धेश लाड दुखापतग्रस्त असल्यामुळे मुंबईच्या फलंदाजीच्या ताकदीवर अंकुश ठेवणे महाराष्ट्राच्या गोलंदाजांना जड जाणार नाही. महाराष्ट्राच्या गोलंदाजीची धुरा असेल ती वेगवान गोलंदाज श्रीकांत मुंडे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षय दरेकरवर.
शार्दुलच्या गोलंदाजीवर झहीर प्रभावित
मुंबई : मुंबईचा कर्णधार झहीर खानने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीची मुक्तकंठाने कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘शार्दुलच्या गोलंदाजीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजीसाठी अपेक्षित असलेला वेग त्याच्याकडे आहे. शार्दुलकडून भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येऊ शकेल.’’
‘‘शार्दुल चांगली फलंदाजीही करतो, तो ही अतिरिक्त जबाबदारी सहजपणे सांभाळतो. त्यामुळे चांगला अष्टपैलू खेळाडू होण्याचे गुण त्याच्यात आहेत,’’ असे झहीरने सांगितले. झहीरने जावेद खानच्या गोलंदाजीचेही कौतुक केले.
प्रतिस्पर्धी संघ
महाराष्ट्र : रोहित मोटवानी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हर्षद खडीवाले, चिराग खुराणा, केदार जाधव, संग्राम अतितकर, अंकित बावणे, अनुपम संकलेचा, अक्षय दरेकर, पुष्कराज चव्हाण, समद फल्लाह, श्रीकांत मुंडे, डॉमनिक जोसेफ मुथ्थूस्वामी, विजय झोल, जय पांडे, शामसुझामा काझी.
मुंबई : झहीर खान (कर्णधार), वसिम जाफर, अभिषेक नायर, आदित्य तरे (यष्टीरक्षक), कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव, विशाल दाभोळकर, जावेद खान, शार्दूल ठाकूर, इक्बाल अब्दुल्ला, सागर करकेरा, विनित इंदुलकर, निखिल पाटील (ज्यु.), सर्वेश दामले, सौरभ नेत्रावळकर.
उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. माझ्या संघात असलेल्या युवा खेळाडूंसह भारतातील कोणत्याही खेळपट्टीवर कोणत्याही संघाशी आम्ही भिडू शकू, याची मला खात्री आहे. – सुरेंद्र भावे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक