जम्मू व काश्मीरच्या शेवटच्या चार फलंदाजांनी झुंजार खेळ करूनही त्यांना महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात निर्णायक पराभवास सामोरे जावे लागले. श्रीकांत मुंढे याचे पाच बळी तर हर्षद खडीवाले याचे नाबाद अर्धशतक, यामुळे महाराष्ट्राने हा सामना नऊ गडी राखून जिंकला.
गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात सोमवारी शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचा निर्णायक विजय निश्चित होता. जम्मू संघाने ६ बाद ३३३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्यांच्याकडून मोठी भागीदारी झाली नाही तरीही त्यांच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या दमदार खेळामुळेच त्यांना ६ बाद ३०० वरून सर्व बाद ४३९ धावांपर्यंत मजल गाठता आली. त्याचे श्रेय परवेझ रसूल याच्या आक्रमक फलंदाजीस द्यावे लागेल. त्याने नाबाद ६४ धावा करताना सात चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. समीउल्ला बेग (२३) व रामदयाल पुनिया (३२) यांनीही संघास चारशे धावांपलीकडे नेण्यासाठी हातभार लावला. महाराष्ट्राकडून मुंढे याने १२३ धावांमध्ये पाच बळी घेतले.
जम्मू संघाने महाराष्ट्रापुढे विजयासाठी १२४ धावांचे आव्हान ठेवले. महाराष्ट्राने २६.२ षटकांत हे आव्हान पार करताना विजय झोल (२६) याची विकेट गमावली. त्यामुळे महाराष्ट्राला बोनस गुण मिळू शकला नाही. या मोसमात सातत्याने चमक दाखविणाऱ्या हर्षद खडीवाले (१३ चौकारांसह नाबाद ७४) व संग्राम अतितकर (नाबाद २१) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राला सहा गुणांची कमाई झाली. पाच सामन्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत १९ गुण मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक-जम्मू व काश्मीर ८५ व ४३९ (ओबेद हरून ९४, बनदीपसिंग ७९, जनदेवसिंग ४६, परवेझ रसूल नाबाद ६४, श्रीकांत मुंढे ५/१२३, समाद फल्लाह २/९८, भरत सोळंकी ३/४७).
महाराष्ट्र ९ बाद ४०१ घोषित व १ बाद १२६ (हर्षद खडीवाले नाबाद ७४, विजय झोल २६, संग्राम अतितकर नाबाद २१).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा