फिरकीपटू अक्षय दरेकरच्या सात बळींच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट लढतीत एक डाव आणि ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चौथ्या आणि अंतिम दिवशी दुसऱ्या डावात ४ बाद ५३ वरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रचा डाव १९८ धावांतच आटोपला.
महाराष्ट्राने पहिल्या डावात ५१९ धावांचा डोंगर उभारला होता. अंकित बावणेने १२४ धावांची खेळी साकारली होती. रोहित मोटवानी (७०), चिराग खुराणा (६९) आणि हर्षद खडीवाले (६७) यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर महाराष्ट्राने दमदार धावसंख्या उभारली. सौराष्ट्रतर्फे कमलेश मकवानाने डावात पाच बळी पटकावले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सौराष्ट्रचा पहिला डाव २७३ धावांतच गडगडला. शेल्डॉन जॅक्सनने १०२ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ मिळू शकली नाही. महाराष्ट्रातर्फे चिराग खुराणाने ७० धावांत पाच बळी घेतले. २४६ धावांनी पिछाडीवर असलेल्या सौराष्ट्रला फॉलोऑन देण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला. पहिल्या डावात चिराग खुराणासमोर शरणागती पत्करलेल्या सौराष्ट्रच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षय दरेकरच्या फिरकीसमोर लोटांगण घातले. अक्षयने ७२ धावांत सात बळी घेतले. दोन्ही डावांत मिळून दहा बळी घेणाऱ्या अक्षयलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.