रणजी चषक स्पर्धेत फलंदाजांची जादू कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवालने त्रिशतकी खेळी करत भारतीय क्रिकेटच्या मैदानात एक नवा इतिहास रचला. तो भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५० वे त्रिशतक करणारा फलंदाज ठरला. आपल्या ३२ व्या प्रथम श्रेणी सामन्यात मयंकने ३०४ धावांची दमदार खेळी करत कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सध्या सुरु असणाऱ्या रणजी चषकातील हे तिसरे त्रिशतक आहे. भारतीय प्रथम श्रेणीच्या मैदानातील हे ५० वे त्रिशतक असून यातील निम्म्याहून अधिक त्रिशतके मागील दहा वर्षांत नोंदवली गेली आहेत.
अग्रवालपूर्वी या सत्रात हिमाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या प्रशांत चोप्राने (३३८) आणि हैदराबादच्या हनुमा विहारीने (३०२) अशी खेळी पाहायला मिळाली होती. २००६-०७ पासून आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मैदानात तब्बल २८ त्रिशतकांची नोंद झाली आहे. अग्रवालने महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात ४९४ चेंडूत २८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३०४ धावा केल्या. त्याने करुण नायरच्या साथीने कर्नाटकसाठी २७० धावांची भक्कम भागीदारी केली. यात करुण नायरने ११६ धावांचे योगदान दिले. अग्रवालचे त्रिशतक आणि नायरच्या संयमी शतकाच्या जोरावर कर्नाटकने पहिला डाव ५ बाद ६२८ धावांवर घोषित केला.
कर्नाटकने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राने अवघ्या १३५ धावात ४ गडी गमावले. महाराष्ट्र अद्यापही कर्नाटकने दिलेल्या आव्हानापासून २४८ धावा दूर आहे. महाराष्ट्राची आघाडीची फलंदाजी या सामन्यात सुरुवातीलाच कोलमडली. अवघ्या ८४ धावावर ४ गडी बाद झाल्यानंतर ऋतूराज गायकवाड (६१) आणि राहुल त्रिपाठी (३१) यांनी महाराष्ट्राच्या डाव सावरला. दोघेही तिसऱ्या दिवसाअखेर नाबाद राहिले. कर्नाटकडून अभिमन्यू मिथुनने सर्वाधिक दोन बळी टिपले.