यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरने आणखी एक शतकी खेळी साकारत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. श्रेयसच्या खेळीमुळेच घरच्या मैदानावर मुंबईला सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले.
चौथ्या आणि अंतिम दिवशी मध्य प्रदेशने ७ बाद ५३८ धावसंख्येवरच आपला डाव घोषित केला. नमन ओझाने १९ चौकार आणि एका षटकारासह १५५ धावांची खेळी साकारली, तर देवेंद्र बुंदेलाने १४ चौकार आणि एका षटकारासह ११५ धावा केल्या. सलामीवीर जलाज सक्सेनाने ८५ धावा केल्या. मुंबईतर्फे इक्बाल अब्दुल्लाने सर्वाधिक ३ बळी घेतले.
१३४ धावांनी पिछाडीवर असलेल्या मुंबईला दुसऱ्या डावात घसरगुंडी होऊ न देण्याची जबाबदारी होती. मात्र अखिल हेरवाडकर ४ धावांवर बाद झाला. मात्र यानंतर आदित्य तरे आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. पुनीत दातेयने आदित्यला बाद करत ही जोडी फोडली. आदित्यच्या जागी आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ एक धाव करून तंबूत परतला. पुनीतनेच त्याला बाद केले.
३ बाद ११० अशा स्थितीतून श्रेयसनेच खेळपट्टीवर नांगर टाकत सावरले. त्याने सिद्धेश लाडसह पाचव्या विकेटसाठी ९५, तर सर्फराझ खानसह सहाव्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. सिद्धेशने ४३, तर सर्फराझने ५२ धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली. श्रेयसने १५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १४२ धावांची खेळी करत मुंबईचा पराभव टाळला.
मध्य प्रदेशतर्फे पुनीत दातेयने सर्वाधिक ३ बळी घेतले. २० धावांवर असताना अवेश खानने श्रेयसचा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा उठवत श्रेयसने मुंबईला संकटातून बाहेर काढले.
सामना अनिर्णीत झाल्याने मध्य प्रदेशला तीन तर मुंबईला एका गुणावर समाधान मानावे लागले. ५ बाद ३७४ अशा सुस्थितीत असणाऱ्या मुंबईचा पहिला डाव ४०४ धावांत रोखण्यात ५ बळींसह महत्वाची भूमिका बजावणाऱ्या योगेश रावतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्रेयस अय्यरची शतकी खेळी
यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरने आणखी एक शतकी खेळी साकारत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-01-2015 at 07:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mp gain three points from drawn match against mumbai