Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs : गतविजेत्या मुंबईने शनिवारी रणजी करंडक स्पर्धेतील एलिट गटाच्या सामन्यात ओडिशाचा एक डाव आणि १०३ धावांनी पराभव केला. या विजयात मुंबईसाठी फिरकीपटू शम्स मुलाणी (५/७१) आणि हिमांशू सिंग (४/७७) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी शम्स मुलाणीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने या सामन्यात एकूण ११ विकेट्स घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात यजमान संघाने ४ बाद ६०२ धावांवर डाव घोषित केला होता. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फॉलोऑन दिल्यानंतर ओडिशाचा संघ दुसऱ्या डावात २१४ धावांत गारद झाला. पहिल्या डावात त्याला केवळ २८५ धावा करता आल्या. शेवटच्या दिवशी ५ बाद १२६ धावांवर खेळत असताना मुलानीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच यष्टीरक्षक फलंदाज आशीर्वाद स्वेन (५१) याला बाद केल्याने ओडिशाच्या आशा मावळल्या.

मुंबई संघाचा डाव –

या सामन्यात ओडिशा संघाने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. या संधीचा मुंबईने पुरेपूर फायदा घेतला. मुंबईने १९ धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे १८ धावा करून बाद झाला. यानंतर मुंबईने १५४ धावांवर सलग २ विकेट्स गमावल्या. अंगकृष्ण रघुवंशी ९२ आणि अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाले. यानंतर श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी ३५४ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न

ही जोडी हर्षित राठोडने तोडली. श्रेयस अय्यरने २२८ चेंडूत २४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २३३ धावा केल्या. सिद्धेश लाड आणि सूर्यांश शेंडगे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची नाबाद भागीदारी केली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव घोषित केला. सिद्धेशने ३३७ चेंडूत १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १६९ धावा केल्या. सूर्यांश शेडगेने ३६ चेंडूत ७९ धावा केल्या. ओडिशाकडून बिप्लब सामंतरेने २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सूर्यकांत प्रधान आणि हर्षित राठोड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mumbai crush odisha by an innings and 103 runs shams mulani takes 11 wickets vbm