सलामीच्या लढतीत जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे गेलेला मुंबईचा संघ उत्तर प्रदेशविरुद्ध विजयपथावर परतला आहे. आता घरच्या मैदानावर मध्य प्रदेशला नमवत आगेकूच करण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे. गुणतालिकेत मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. ४१वे जेतेपद पटकावण्यासाठी मुंबईला जास्तीत जास्त विजयांची आवश्यकता आहे. श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर या त्रिकुटावर फलंदाजीची भिस्त आहे.
अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूरने गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली चमक दाखवत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. मध्य प्रदेशविरुद्धही शार्दूलकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. क्षेमल वायंगणकर, विल्कीन मोटा यांची साथ मिळाल्यास मुंबईची गोलंदाजी भेदक ठरू शकते. फिरकीपटू इक्बाल अब्दुल्ला याला सूर गवसणे मुंबईसाठी महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे नमन ओझा आणि जलाज सक्सेना मध्य प्रदेशसाठी हुकमी खेळाडू आहेत. कर्णधार देवेंद्र बुंदेलाचा फॉर्म मध्य प्रदेशसाठी जमेची बाजू आहे. प्रमुख गोलंदाज ईश्वर पांडे दुखापतग्रस्त झाल्याने मध्य प्रदेशची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत पुनीत दातेय आणि अवेश खान यांच्यावर भिस्त आहे.
मुंबई- सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, श्रीदीप मंगेला, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सुफियान शेख, सर्फराझ खान, इक्बाल अब्दुल्ला, अक्षय गिरप, शार्दूल ठाकूर, विल्कीन मोटा, अलम बद्रे, क्षेमल वायंगणकर, जावेद खान.
मध्य प्रदेश- देवेंद्र बुंदेला (कर्णधार), नमन ओझा, जलाज सक्सेना, हरप्रीत सिंग भाटिया, रमीझ खान, अंकित शर्मा, पुनीत दातेय, शुभम शर्मा, संजय मिश्रा, अवेश खान, आनंद सिंग बैस, सारांश जैन, अंकित खुशवाह, आदित्य श्रीवास्तव, योगेश रावत, अंकित दवे.