मुंबई : मुंबईने वानखेडे स्टेडियमवरील बडोद्याविरुद्धची लढत अनिर्णीत राखली आणि रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील अ-गटात तीन गुणांची कमाई केली.
रविवारी मुंबईने पहिल्या डावात २९ धावांची आघाडी घेत सामन्यातील उत्कंठा वाढवली होती. मग मुंबईची २ बाद ११ अशी दुसऱ्या डावात अवस्था केल्यानंतर बडोद्याच्या आशा उंचावल्या होत्या. मग कर्णधार सिद्धेश लाडसुद्धा फार काळ टिकाव धरू शकला नाही. पाठोपाठ पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यरसुद्धा (३०) लवकर बाद झाला. त्यामुळे ४ बाद ७५ अशी यजमानांची अवस्था झाली. पण शुभम रांजणे (६४), एकनाथ केरकर (नाबाद ५६) आणि शिवम दुबे (७६ धावा) या मधल्या फळीतील फलंदाजांच्या झुंजार फलंदाजीमुळे मुंबईला दुसऱ्या डावात ७ बाद ३०७ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे ३३६ धावांच्या एकूण आघाडीसह मुंबईने दुसरा डाव घोषित केला.
बडोद्याकडून हार्दिक पंडय़ाने १० षटके गोलंदाजी करताना दोन बळी घेतले, तर रिशी आरोठेनेसुद्धा दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४६५
बडोदा (पहिला डाव) : ४३६
मुंबई (दुसरा डाव) : ७ बाद ३०७ डाव घोषित (शिवम दुबे ७६, शुभम रांजणे ६४; हार्दिक पंडय़ा २/२१, रिशी आरोठे २/५१)
’ निकाल : सामना अनिर्णीत
’ गुण : मुंबई ३, बडोदा १