कमकुवत विदर्भावर निर्णायक विजय मिळवून मुंबई रविवारी आपल्या खात्यावर सहा गुण जमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विजयासाठी ५३० धावांच्या अजस्र आव्हानापुढे विदर्भाची फलंदाजी दुसऱ्या डावातही कोलमडली असून, तिसऱ्या दिवसअखेर त्यांची ८ बाद १७७ अशी अवस्था झाली आहे. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीवरील आपले वर्चस्व दाखवले. फक्त विदर्भचा संघनायक शलभ श्रीवास्तवने चिकाटीने मैदानावर उभे राहून ६९ धावा केल्या. परंतु त्याला तोलामोलाची साथ लाभू शकली नाही. त्याआधी मुंबईच्या दुसऱ्या डावात आदित्य तरेपाठोपाठ अजिंक्य रहाणेने आपले शानदार शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी आपले नाणे खणखणीत असल्याचा इशारा दिला आहे.
तरे आणि रहाणे या शुक्रवारच्या नाबाद जोडीने शनिवारी सकाळीपासूनच विदर्भाच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केले. या जोडीने एकंदर ३२७ चेंडूंत २६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत मुंबईला दुसऱ्या डावात सुस्थितीत राखले. द्विशतकाकडे कूच करणाऱ्या तरेचा अडसर रवी जांगीडने दूर केला. तरेने १६ चौकार आणि ६ षटकारांनिशी १७२ धावांची दमदार खेळी साकारली. तथापि, रहाणेला अक्षत वाखरेने तंबूची वाट दाखवली. राणेने १४ चौकार आणि एका षटकारासह १३३ धावा केल्या. उत्तरार्धात सूर्यकुमार यादवने नाबाद ४९ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने दुसऱ्या डावात ४ बाद ३८१ अशी भक्कम धावसंख्या उभारल्यानंतर पाचशेच्या पलीकडे आघाडी पुरेशी असल्याची खात्री पटल्यावर संघाचा डाव घोषित केला.
मग मोठय़ा धावसंख्येच्या दडपणाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या दुसऱ्या डावावर झहीर खान, अकबर खान आणि शार्दूल ठाकूरने यांनी अंकुश ठेवला. फक्त श्रीवास्तव आणि हेमांग बदानी यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून विदर्भाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकरने रवी जांगिड आणि श्रीवास्तव असे दोन बळी घेत आपला करिश्मा दाखवला. फक्त दोन फलंदाज बाकी असलेला विदर्भचा संघ अद्याप ३५३ धावांनी पिछाडीवर असल्याने त्यांचा पराभव अटळ आहे. उमेश यादव (५) बाद झाल्यावर खेळ थांबला, तेव्हा श्रीकांत वाघ ३४ धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : २६१
विदर्भ (पहिला डाव) : ११३
मुंबई (दुसरा डाव) : ८० षटकांत ४ बाद ३८१ डाव घोषित (आदित्य तरे १७२, अजिंक्य रहाणे १३३, सूर्यकुमार यादव नाबाद ४९; रवी जांगिड २/८८)
विदर्भ (दुसरा डाव) : ४१ षटकांत ८ बाद १७७ (शलभ श्रीवास्तव ६९, हेमांग बदानी १९, श्रीकांत वाघ खेळत आहे ३४; शार्दूल ठाकूर २/४६, विशाल दाभोळकर २/२१)
मुंबई विजयाच्या उंबरठय़ावर
कमकुवत विदर्भावर निर्णायक विजय मिळवून मुंबई रविवारी आपल्या खात्यावर सहा गुण जमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विजयासाठी ५३० धावांच्या
First published on: 01-12-2013 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mumbai on brink of huge win