मुंबई : अखेरच्या दिवशी दोनही संघांनी केलेल्या झुंजार खेळानंतर मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरचा व निर्णायक साखळी सामना अनिर्णित राहिला. मात्र, या निकालामुळे दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ब-गटातून सौराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या अव्वल दोन संघांनी आगेकूच केली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांची पहिल्या डावात ३८४ अशी समान धावसंख्या झाली. मुंबईकडून पहिल्या डावात प्रसाद पवार (१४५) आणि तनुष कोटियन (९३) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. अखेरीस डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या नादात कोटियन बाद झाला आणि मुंबईची आघाडीची संधी हुकली.
अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची दुसऱ्या डावात ५ बाद ६८ अशी स्थिती झाली होती. परंतु, अझीम काझी (७५), सौरभ नवले (४७) आणि आशय पालकर (२७) यांनी चिवट फलंदाजी करत महाराष्ट्राला सुस्थितीत पोहोचवले. महाराष्ट्राचा दुसरा डाव २५२ धावांवर संपुष्टात आला आणि मुंबईला विजयासाठी २५३ धावांचे आव्हान मिळाले. मुंबईने आक्रमक शैलीत खेळ केला. कर्णधार अजिंक्य रहाणे (३० चेंडूंत ३५), दिव्यांश सक्सेना (४८ चेंडूंत ६२) आणि सुवेद पारकर (२७ चेंडूंत नाबाद ३८) यांनी चांगली फटकेबाजी केली. मात्र, दिवसअखेर मुंबईला ६ बाद १९५ धावांपर्यंतच पोहोचता आले.
बोनस गुण निर्णायक
उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी किमान पहिल्या डावात आघाडी मिळवणे गरजेचे होते. या परिस्थितीत सामना अनिर्णित राहिला असता, तरी पहिल्या डावातील आघाडी घेणाऱ्या संघाने एकूण तीन गुणांची कमाई करत उपांत्यपूर्व फेरी गाठली असती. मात्र, पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३८४ अशी समान धावसंख्या केली. त्यामुळे अनिर्णित सामन्याअंती दोन्ही संघांना केवळ एकेक गुण मिळाला. सौराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीनही संघांचे साखळी फेरीअंती २६ गुण होते. मात्र, सौराष्ट्र आणि आंध्र यांच्या खात्यावर अधिक बोनस गुण असल्याने त्यांनी आगेकूच केली.