Mumbai vs Vidharbha Ranji Trophy Highlights in Marathi: रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरी सामन्यात विदर्भाने मुंबईचा पराभव करत रणजीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. विदर्भाने मुंबईकडून गतवर्षीच्या पराभवाचा बदला घेत ८० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये विदर्भचा अंतिम फेरीत पराभव करत विक्रमी ४२ वे रणजी करंडक पटकावले होते. आता विदर्भने मुंबईच्या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाला विजयाची कोणतीच संधी न देता शानदार विजय आपल्या नावे केला. विदर्भ आणि केरळ यांच्यात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

मुंबईला विजयासाठी ४०६ धावांचे लक्ष्य विदर्भने दिले होते. पण मुंबईची फलंदाजी फळी या सामन्यातील दुसऱ्या डावातही अपयशी ठरली. सध्या मैदानावर १०व्या विकेटसाठी रॉयस्टन डायस आणि मोहित अवस्थीची जोडी खेळत आहे, ज्यांनी संघाचा डाव चांगलाच उचलून धरला आहे. मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस या जोडीने ४४ धावांची भागीदारी करत मुंबईला सामन्यात कायम ठेवलं. पण टी-ब्रेकनंतर मोहित अवस्थी बाद झाल्यने मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

मुंबईकडून दुसऱ्या डावात सलामीवीर आकाश आनंद ३९ धावा करत बाद झाला. यानंतर आयुष म्हात्रे १८ तर सिद्धेश लाड २ धावा करत बाद झाल्याने मुंबईला मोठा धक्का बसला. या तिघांनाही हर्ष दुबेने बाद केले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेदेखील अवघ्या १२-१२ धावा करत झेलबाद झाले. तर सूर्यकुमार यादवही २३ धावा करत बाद झाल्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यानंतर मुंबईच्या खालच्या फळीतील गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंनी विदर्भच्या गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी करताना दिसले. शम्स मुलानी ४६ धावा करत धावबाद झाला तर शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावत ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

विदर्भने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाने मोठी धावसंख्या उभारत हा निर्णय अगदी योग्य ठरवला. संघातील सर्वच खेळाडूंनी धावांमध्ये भर घातली. सलामीवीर अथर्व तायडे ४ धावा करत बाद झाला, पण ध्रुव शोरेने ७४ धावांची शानदार खेळी केली. तर दानिश मलेवारने ७९ धावांची, करूण नायर ४५ धावा, यश राठोड ५४ धावा, तर कर्णधार अक्षय वाडकरने ३४ धावांची खेळी करत संघाने ३८३ धावांचा डोंगकर उभारला. मुंबईकडून शिवम दुबेने ५ विकेट्स घेतले. तर रॉयस्टन डायस आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले आणि शार्दुल ठाकूरने १ विकेट मिळवली.

विदर्भच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात मुंबईचा संघ आकाश आनंदच्या शतकाच्या जोरावर २७० धावा करत सर्वबाद झाला. आकाश आनंदनंतर सिद्धेश लाड (३५), शार्दुल ठाकूर (३७) आणि तनुष कोटियन (३३) यांच्याशिवाय कोणालाच २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. पार्थ रेखाडेने अजिंक्य रहाणेला १८ धावांवर तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला खातेही न उघडता माघारी धाडले. मुंबईचा संघ एकेकाळी सामन्यात २ विकेट ११३ धावांवर खेळत होता. पण पार्थ रेखाडेच्या या ३ विकेट्समुंळे मुंबईची अवस्था ५ बाद ११४ अशी झाली आणि विदर्भला पहिल्या डावात चांगली आघाडी घेता आली.

११३ धावांची आघाडी घेत विदर्भचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला आणि त्यांनी २९२ धावांचा डोंगर उभारला. यश राठोड १५१ धावा आणि कर्णधार अक्षय वाडकरच्या ५२ धावांच्या जोरावर विदर्भने ४०० अधिक धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात मुंबईकडून शम्स मुलानीने ६ विकेट्स, शार्दुलने १ विकेट तर तनुष कोटियनने ३ विकेट्स घेतल्या.

Story img Loader