निर्जीव खेळपट्टी, बोथट गोलंदाजी आणि ओडिशाच्या अध्र्या संघाला झेल सोडून दिलेल्या जीवदानांमुळे विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या ‘खडूस’ मुंबईच्या रणजी संघाने अखेर माती खात निराशाजनक कामगिरीची पुनरावृत्ती केली. पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरलेल्या ४० वेळा रणजी विजेत्या मुंबईला ओडिशाचा दुसरा डाव गुंडाळण्यात धाप लागली आणि आपल्या पदरात त्यांना विजयाऐवजी फक्त तीन गुण पाडून घेता आले. सामनावीर नटराज बेहराने मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवत दुसऱ्या डावातही शतक झळकावले. त्याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ओडिशाने दुसऱ्या डावात ५ बाद ३६५ अशी मजल मारत संघाला पराभवाच्या छायेतून सहजपणे दूर लोटले आणि सामना अनिर्णित राखला. विजयापासून वंचित राहिलेल्या मुंबईने पहिल्या डावात आघाडी मिळवत तीन गुण मिळवले असले तरी २३ गुणांनिशी त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
अखेरच्या दिवशी विजयाची मुंबईची आशा पहिल्या सत्रातच मावळली, कारण त्यांनी दोन झेल सोडले आणि एकही बळी मिळवता आला नाही. नटराज आणि नीरंजन बेहरा (५९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या विजयाचे मनसुबे उधळले. नटराजने १७ चौकार आणि तीन षटकार खेचत नाबाद १२७ धावा फटकावल्या आणि मुंबईची गोलंदाजी निष्प्रभ, बोथट, बेसूर, प्रभावहीन असल्याचे त्याने पुन्हा दाखवून दिले. बळी मिळत नसल्यामुळे निराश झालेला मुंबईचा संघ आणि ओडिशाने चहापानानंतर ३५ मिनिटांनी सामना अनिर्णीत ठेवण्याचा निर्णय घेतला. ओडिशाने दुसऱ्या डावात ५ बाद ३५२ अशी मजल मारल्याने मुंबईच्या गोलंदाजीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ५०१ (घोषित)
ओडिशा (पहिला डाव) : ६३.५ षटकांत सर्व बाद २५६
ओडिशा (दुसरा डाव) : १२२ षटकांत ५ बाद ३५६ (नटराज बेहरा नाबाद १२७; प्रवीण तांबे २/१२७).
जाफरकडेच मुंबईचे नेतृत्व
मुंबई : कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघाचे नेतृत्व वसिम जाफरकडे देण्यात आले आहे. संघ : वसिम जाफर (कर्णधार), आदित्य तरे (यष्टीरक्षक व उपकर्णधार), हिकेन शाह, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, कौस्तुभ पवार, बलविंदर सिंग संधू (कनिष्ठ), विशाल दाभोळकर, जावेद खान, शार्दूल ठाकूर, प्रवीण तांबे, मनीष राव, सागर केरकर, सौरभ नेत्रावळकर, सुब्रमण्यम दोराईस्वामी.
मी आणि हिकेनने दोन झेल सोडले, तिथेच आम्ही सामना जिंकण्याची संधी गमावली. हे दोन्ही झेल टिपले गेले असते तर सामना आम्हीच जिंकला असता. संघातील गोलंदाज अननुभवी असून त्यांना अजून वेळ द्यायला हवा.
– वसिम जाफर, मुंबईचा कर्णधार.