Prithvi Shaw Dropped From Mumbai Squad : एक काळ असा होता की मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉमध्ये सचिन तेंडुलकरची झलक पाहायला मिळत होती. शॉने अगदी कमी वयातच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, पण तिथेही तो स्वत:ला कायम ठेवू शकला नाही आणि लवकरच त्याने टीम इंडियातील आपले स्थान गमावले. आता मुंबई संघातूनही शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले स्थान गमावताना दिसत आहे. कारण त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील त्रिपुराविरुद्ध खेळल्या जाणऱ्या सामन्यातील संघातून पृथ्वी शॉला संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याला संघातून वगळण्याचे कारण त्याचा खराब फॉर्म आणि फिटनेस असल्याचे सांगितले जात आहे.
पृथ्वी शॉ खराब फॉर्म –
पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठी खेळी पाहिला मिळालेली नाही. फॉर्म व्यतिरिक्त त्याचा फिटनेस ही देखील मोठी समस्या आहे. त्याच्यावर अनुशासनहीनतेचा आरोपही करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकात पृथ्वी शॉची निवड न करण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. संजय पाटील (अध्यक्ष), रवी ठाकरे, जितेंद्र ठाकरे, किरण पोवार आणि विक्रांत येलागेट्टी यांचा समावेश असलेल्या मुंबई निवड समितीने शॉला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
पृथ्वी शॉच्या शरीरात ३५ टक्के फॅट –
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम मॅनेजमेंटने एमसीएला कळवले आहे की पृथ्वी शॉच्या शरीरात ३५ टक्के फॅट आहे आणि संघात परत येण्यापूर्वी त्याला कठोर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्याला वगळण्यात आले आहे आणि निवडीसाठी विचारात घेण्यासाठी त्याला प्रशिक्षणात परत जाणे आणि शरीराचे वजन कमी करणे आवश्यक आहे.
नेट सत्रे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप –
क्रिकबझच्या वृत्तानुसार, शॉची अनुशासनहीनता ही मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. निवडसमिती आणि संघ व्यवस्थापन यांना शॉला वगळून धडा शिकवायचा आहे. पृथ्वीचे नेट सत्रात उशिरा येणे ही संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब आहे. याशिवाय, असे सांगण्यात आले की तो नेट सत्रे गांभीर्याने घेत नाही आणि त्याच्या वजनाबद्दलही चिंता वाढत आहे. पृथ्वी शॉला संघातून वगळण्याचा निर्णय केवळ निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा नव्हता, तर प्रशिक्षक आणि कर्णधारालाही त्याला संघातून वगळण्याची इच्छा होती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – सर्फराझ खान झाला ‘बापमाणूस’! इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
पृथ्वी शॉ भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतीय संघासाठी ५ कसोटी सामन्यात ३३९ धावा आणि ६ एकदिवसीय सामन्यात १८९ धावा केल्या आहेत. याशिवाय तो एक टी-२० सामनाही खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये खेळला होता. सध्या तरी त्याचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता नाही.