१० गडय़ांनी पराभवाची नामुष्की; रहाणे पुन्हा अपयशी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

मुंबई : रेल्वेने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०१९-२०च्या हंगामातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ अशी ख्याती असलेल्या मुंबईवर १० गडी राखून दणदणीत विजयाची त्यांनी शुक्रवारी नोंद केली.

वानखेडे स्टेडियमवर तीन दिवसांत संपलेल्या या ब-गटातील सामन्यात रेल्वेने पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करताना मुंबईचा पहिला डाव ११४ धावांवर गुंडाळला. मग कर्णधार कर्ण शर्माच्या (नाबाद ११२) झुंजार शतकाच्या बळावर बडोद्याने पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानपुढे (६० धावांत ५ बळी) मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांत गडगडला. विजयासाठी ४७ धावांचे तुटपुंजे आव्हान रेल्वेने १२व्या षटकातच साधले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंग (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून देत एका बोनस गुणाची भरसुद्धा घातली.

४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईने ३ बाद ६४ धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. खेळपट्टीवर ठाण मांडत दोन पूर्ण दिवस खेळून काढल्यास किमान सामना अनिर्णीत राखता येईल, हेच त्यांचे ध्येय होते; परंतु खेळपट्टीवर नांगर टाकण्यात माहीर असलेला कसोटीपटू अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही निराशा केली. गुरुवारी तीन धावांवर नाबाद असलेल्या रहाणेने पाच धावांची भर घातली आणि ८ धावांवर तो तंबूत परतला. ६३ कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेला रहाणे सांगवानच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक नितीन भिलेकडे झेल देऊन बाद झाला आणि मुंबईची स्थिती ४ बाद ६९ अशी झाली.

मग कर्णधार सूर्यकुमार यादव (९४ चेंडूंत १२ चौकारांसह ६५ धावा) आणि अनुभवी आदित्य तरे (४७ चेंडूंत १४ धावा) यांनी पाचव्या गडय़ासाठी ६४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रेल्वेच्या गोलंदाजांना झगडायला लावण्याच्या इराद्याने सूर्यकुमारने आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळाऐवजी संयमी फटक्यांना प्राधान्य दिले. परंतु पहिल्या डावात सहा बळी घेणारा वेगवान गोलंदाज टी. प्रदीपने तरेला बाद करून ही जोडी फोडली. हा झेलसुद्धा यष्टीरक्षक भिलेनेच घेतला.

तरे तंबूत परतल्यानंतर रेल्वेच्या गोलंदाजांनी सूर्यकुमार आणि शाम्स मुलानी (१) यांना झटपट बाद करीत मुंबईची अवस्था ७ बाद १३५ अशी केली. परंतु शार्दूल ठाकूर (३१ चेंडूंत २१ धावा) आणि आकाश पारकर (७५ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३५) यांनी आठव्या गडय़ासाठी २९ धावांची भागीदारी करून मुंबईचा डावाने पराभव टाळला.

लेग-स्पिनर कर्णने पारकरला बाद केले. तेव्हा पंचांनी तो नोबॉल ठरवल्याने त्याला जीवदान मिळाले. उपहाराआधी शार्दूल कर्णच्या गोलंदाजी स्लिपमध्ये मृणालकडे झेल देऊन बाद झाला आणि मुंबईची स्थिती ८ बाद १६४ अशी झाली. मग पारकरने तळाच्या फलंदाजांच्या साथीने रेल्वेपुढे किमान ४७ धावांचे आव्हान ठेवले.

रणजी हंगामाचा प्रारंभ बडोद्यावरील दिमाखदार विजयानिशी करणाऱ्या मुंबईचा तिसरा सामना ३ जानेवारीपासून वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार जिमखाना मैदानावर कर्नाटकविरुद्ध होणार आहे.

.तरीही तीन दिवसांत खेळ खल्लास!

सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत अपुरा सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रहण यांच्यामुळे ४२ दिवसांचा खेळ वाया गेला, तरी रेल्वेने तिसऱ्या दिवशीच विजयाची नोंद केली. त्यामुळे रेल्वेचा मुंबईवरील शानदार विजय हा खास म्हणता येईल.

संक्षिप्त धावफलक

* मुंबई (पहिला डाव) : ११४

* रेल्वे (पहिला डाव) : २६६

* मुंबई (दुसरा डाव) : ६३ षटकांत सर्व बाद १९८ (सूर्यकुमार यादव ६५, आकाश पारकर नाबाद ३५; हिमांशू सांगवान ५/६०)

* रेल्वे (दुसरा डाव) : ११.४ षटकांत बिनबाद ४७ (मृणाल देवधर नाबाद २७)

* सामनावीर : कर्ण शर्मा

* निकाल : रेल्वे १० गडी राखून विजयी

* गुण : रेल्वे ७, मुंबई ०

Story img Loader