क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची अदाकारी पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या क्रिकेटरसिकांची रविवारी घोर निराशा झाली. पहिलवानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लाहली नावाच्या छोटय़ाशा गावात सचिन आपल्या कारकिर्दीतील अखेरचा रणजी सामना खेळणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सचिनला याचि डोळा पाहण्यासाठी रणजी सामन्यालाही क्रिकेटरसिकांनी आवर्जून हजेरी लावल्यामुळे लाहली या गावाकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. परंतु फक्त ७ चेंडूंमध्ये एक चौकारानिशी ५ धावा काढून सचिन माघारी परतला. हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याचा त्रिफळा उडवून क्रिकेटरसिकांना निराश केले.
मुंबईच्या सलामीच्या रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहित शर्माने आपल्या अष्टपैलू खेळानिशी छाप पाडली. परंतु दिवसाच्या खेळावर मात्र मुंबईचे नियंत्रण होते. झहीर खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर हरयाणाचा डाव फक्त १३४ धावांमध्ये गुंडाळला. त्यानंतर दिवसअखेपर्यंत मुंबईने ४ बाद १०० अशी मजल मारली. मुंबईचा संघ अद्याप ३४ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि नाइट वॉचमन धवल कुलकर्णी अनुक्रमे ४४ आणि १ धावांवर खेळत होते.
४० वेळा रणजी विजेत्या मुंबईने हरयाणाचा डाव गुंडाळून कमाल केली. या धावसंख्येत मोहितच्या ४९ धावांचा सिंहाचा वाटा आहे. अभिषेक नायरने चार बळी घेत हरयाणाचे शेपूट गुंडाळले. त्यानंतर त्याने २४ धावाही केल्या.
संक्षिप्त धावफलक
हरयाणा (पहिला डाव) : ३५.३ षटकांत सर्व बाद १३४ (अभिमन्यू खोड २७, मोहित शर्मा ४९; जावेद खान २/१२, अभिषेक नायर ४/३८)
मुंबई (पहिला डाव) : ४४ षटकांत ४ बाद १०० (अजिंक्य रहाणे नाबाद ४४, अभिषेक नायर २४; मोहित शर्मा २/२७)

सचिनला ‘गार्ड ऑफ ऑनर’
अखेरच्या रणजी सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सचिन तेंडुलकरला या वेळी दोन्ही संघांनी ‘गार्ड ऑफ ऑॅनर’ने मानवंदना दिली. चौधरी बन्सी लाल स्टेडियमवर आठ हजारहून अधिक क्रिकेटरसिकांच्या उपस्थितीत मुंबई आणि हरयाणाच्या खेळाडूंनी दोन रांगेत उभे राहून क्रिकेटमधील या लाडक्या फलंदाजाला मानवंदना दिली. या वेळी हरयाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांनी सचिनचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

Story img Loader