आक्रमण हेच बचावाचे सर्वोत्तम हत्यार असते, हाच दृष्टिकोन मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी गुरुवारी बाळगला होता. त्यामुळे हल्ला-प्रतिहल्ला यांचे ‘थ्रीडी शोले’ नाटय़ क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन ठरणाऱ्या वानखेडेच्या हिरव्यागार खेळपट्टीवर मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने ‘गब्बर’ कामगिरीसह छाप पाडली आणि महाराष्ट्राच्या डावावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने सामन्यावरील आपली पकड घट्ट केली होती.
महाराष्ट्राकडून मधल्या फळीतील फलंदाज अंकित बावणेने मुंबईच्या आक्रमक क्षेत्ररक्षणाची बंधने झुगारून धडाकेबाज फलंदाजी केली. परंतु दुर्दैवाने तो शतकापासून वंचित राहिला. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने तूर्तास फॉलो-ऑनची नामुष्की वाचवली आहे. परंतु ते मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अद्याप १८३ धावांनी पिछाडीवर आहेत आणि त्यांचे सात फलंदाज तंबूत परतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची मदार आता तळाच्या फलंदाजांवरच आहे.
वेगवान आणि उसळणाऱ्या चेंडूंनिशी शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीने दुसऱ्या दिवसावर हुकूमत गाजवली. त्यामुळेच दिवसअखेर त्याच्या खात्यावर ६२ धावांत ४ बळी जमा होते. तीन स्लिप, एक गली, दोन पॉइंट्स, दोन शॉर्ट लेग आणि एक स्क्वेअर लेग अशा आक्रमक क्षेत्ररक्षणानिशी ठाकूरची गोलंदाजी खेळणे महाराष्ट्राच्या फलंदाजांना जड गेले. अपवाद फक्त अंकित बावणेचा ठरला. त्याने या आक्रमक रणनीतीचे चक्रव्यूह भेदत मुंबईच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. मध्यमगती गोलंदाज जावेद खानला तर त्याने एका षटकात चार चौकारसुद्धा खेचले. ३५ धावांवर असताना त्याला जीवदानही मिळाले. परंतु त्याचा आवेश मात्र कायम होता. अखेर ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक आदित्य तरेने त्याचा सुरेख झेल टिपला आणि शतकाकडे कूच करणारी ही खेळी अपूर्ण राहिली. दोन तास १० मिनिटे मैदानावर तग धरणाऱ्या बावणेने ११३ चेंडूंत १२ चौकार आणि २ षटकारांनिशी ८४ धावांची झुंजार खेळी उभारली. त्याला अर्धशतकी खेळी करत केदार जाधवने महत्त्वाची साथ दिली. प्रारंभीच्या षटकांमध्ये झहीर खान आणि ठाकूरने महाराष्ट्राची ३ बाद २४ अशी त्रेधातिरपीट उडवली होती; पण बावणे आणि जाधव यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. उत्तरार्धात महाराष्ट्राचा डाव पुन्हा गडगडला आणि दिवसअखेर त्यांची ७ बाद २१९ अशी अवस्था झाली.
त्याआधी, सकाळच्या सत्रात मुंबईच्या तळाच्या फलंदाजांनी अनपेक्षितपणे किल्ला लढवला आणि मुंबईला ४०२ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कर्णधार झहीर आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी आठव्या विकेटसाठी ११२ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. झहीरने चार चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या, तर अब्दुल्लाने तीन तास चिवट झुंज दिली. तो ३ चौकारांसह ४९ धावा काढून नाबाद राहिला.

आक्रमक रणनीती यशस्वी ठरली -ठाकूर
मुंबई : ‘‘खेळपट्टीकडून योग्य मदत मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या फलंदाजांवर आक्रमक पद्धतीनेच सामोरे जाण्याची आमची योजना यशस्वी ठरली. झहीर खान मैदानावर वेळोवेळी मला मार्गदर्शन करीत होता. कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे चेंडू टाकावा, हे त्याला चांगले ज्ञात आहे,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने सामन्यानंतर व्यक्त केली.
२२ वर्षीय शार्दूल पुढे म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी रणजी स्पध्रेच्या उत्तरार्धात मी मुंबई संघात आलो. हंगामपूर्व काळात मी माझ्या गोलंदाजीवर अधिक मेहनत घेतली. ते मला फायदेशीर ठरत आहे.’’
महाराष्ट्राचा फलंदाज अंकित बावणे म्हणाला की, ‘‘महाराष्ट्राची ३ बाद २४ अशी अवस्था झाली होती आणि नजीकच्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्याच्या ईष्र्येनेच मी फलंदाजी केली. मुंबईने विशेषत: शार्दूल ठाकूरने अतिशय चांगली गोलंदाजी केली.
 तो पुढे म्हणाला, ‘‘मी अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी माझ्या कारकिर्दीत कधीच प्रत्यक्षात अनुभवली नव्हती. परंतु श्रीकांत मुंडे आणि अक्षय दरेकर मैदानावर आहेत. त्यामुळे अजून ८० ते १०० धावा सहज होऊ शकतील. त्यानंतर मुंबईचा दुसरा डाव लवकर गुंडाळण्याची आमची योजना आहे.’’

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ११६.३ षटकांत सर्व बाद ४०२ (वसिम जाफर ४४, विनीत इंदुलकर ८२, सूर्यकुमार यादव १२०, इक्बाल अब्दुल्ला नाबाद ४९, झहीर खान ३९; समद फल्लाह ४/१०३, अनुपम संकलेचा ३/७७)
महाराष्ट्र (पहिला डाव) : ५७ षटकांत ७ बाद २१९ (केदार जाधव ५१, अंकित बावणे ८४; झहीर खान १/४०, शार्दूल ठाकूर
४/६२).

रणजी वृत्तांत : पंजाबविरुद्ध रसूल चमकला
बडोदा : पंजाबला ३०४ धावांत रोखल्यानंतर परवेझ रसूलच्या शतकाच्या आधारे जम्मू आणि काश्मीर संघाने २७७ धावांचे प्रत्युतर दिले. पंजाबला २७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. १ बाद ११ वरुन पुढे खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीरच्या डावाला आकार दिला तो रसूलच्या शतकाने. त्याने ११ चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची खेळी साकारली. अदिल रिशीने ६५ तर समीऊल्ला बेगने ३७ धावा केल्या. पंजाबतर्फे संदीप शर्माने ४ बळी घेतले. अल्प आघाडी घेऊन खेळणाऱ्या पंजाबची दुसऱ्या डावात २ बाद १५ अशी घसरण झाली. मनन व्होरा ७ तर जीवनज्योत सिंग ८ धावा करुन तंबूत परतला. पंजाबकडे ४२ धावांची आघाडी आहे.

महेश रावतचे शतक, रेल्वेची झुंज
कोलकाता : महेश रावतच्या शतकी खेळीच्या जोरावर रेल्वेने बंगालविरुद्ध ५ बाद २३३ अशी मजल मारली. रेल्वेची सुरुवात खराब झाली. अमित पौनीकर अशोक दिंडाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. शिवकांत शुक्ला ६ धावा करुन बाद झाला. जोनाथनला भोपळाही फोडता आला नाही. नितीन भिल्ले २० धावा करुन दिंडाच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाकडे झेल देऊन बाद झाला. करण शर्माही झटपट माघारी परतल्याने रेल्वेची ५ बाद ४२ अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर मनोज रावत आणि अरिंदम घोष यांनी पाचव्या विकेटसाठी अभेद्य १९१ धावांची भागीदारी रचत रेल्वेला संकटातून बाहेर काढले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महेश १०५ तर अरिंदम ७८ धावांवर खेळत आहे. रेल्वेचा संघ अजूनही ८४ धावांनी पिछाडीवर आहे. अशोक दिंडाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तत्पूर्वी ८ बाद २७४ धावांवरुन पुढे खेळणाऱ्या बंगालचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला. वृद्धिमान साहाचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने ११ चौकार आणि एका षटकारासह ८७ धावांची खेळी केली. रेल्वेतर्फे अनुरित सिंगने ४ बळी घेतले.

चिदम्बरम गौतमचे शतक
बंगळुरू : रॉबिन उथप्पा आणि करुण नायर यांच्यापाठोपाठ कर्नाटकतर्फे चिदम्बरम गौतमने शतकी खेळी करत कर्नाटकला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. १०० धावा करुन गौतम अमित मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला. नायर आणि उथप्पाप्रमाणेच गौतमही १०० धावांवरच बाद झाला. उत्तर प्रदेशतर्फे अमित मिश्राने १०६ धावा देत ६ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर प्रदेशने ९ बाद २२१ अशी मजल मारली. परविंदर सिंगने १३ चौकारांसह ९२ धावांची झुंजार खेळी केली. पीयुष चावलाने ५६ धावा करत परविंदरला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. उत्तर प्रदेशचा संघ अजूनही १२८ धावांनी पिछाडीवर आहे. कर्नाटकतर्फे अभिमन्यू मिथुनने सर्वाधिक ४ बळी घेतले.

Story img Loader