आक्रमण हेच बचावाचे सर्वोत्तम हत्यार असते, हाच दृष्टिकोन मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी गुरुवारी बाळगला होता. त्यामुळे हल्ला-प्रतिहल्ला यांचे ‘थ्रीडी शोले’ नाटय़ क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन ठरणाऱ्या वानखेडेच्या हिरव्यागार खेळपट्टीवर मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने ‘गब्बर’ कामगिरीसह छाप पाडली आणि महाराष्ट्राच्या डावावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने सामन्यावरील आपली पकड घट्ट केली होती.
महाराष्ट्राकडून मधल्या फळीतील फलंदाज अंकित बावणेने मुंबईच्या आक्रमक क्षेत्ररक्षणाची बंधने झुगारून धडाकेबाज फलंदाजी केली. परंतु दुर्दैवाने तो शतकापासून वंचित राहिला. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने तूर्तास फॉलो-ऑनची नामुष्की वाचवली आहे. परंतु ते मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अद्याप १८३ धावांनी पिछाडीवर आहेत आणि त्यांचे सात फलंदाज तंबूत परतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची मदार आता तळाच्या फलंदाजांवरच आहे.
वेगवान आणि उसळणाऱ्या चेंडूंनिशी शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीने दुसऱ्या दिवसावर हुकूमत गाजवली. त्यामुळेच दिवसअखेर त्याच्या खात्यावर ६२ धावांत ४ बळी जमा होते. तीन स्लिप, एक गली, दोन पॉइंट्स, दोन शॉर्ट लेग आणि एक स्क्वेअर लेग अशा आक्रमक क्षेत्ररक्षणानिशी ठाकूरची गोलंदाजी खेळणे महाराष्ट्राच्या फलंदाजांना जड गेले. अपवाद फक्त अंकित बावणेचा ठरला. त्याने या आक्रमक रणनीतीचे चक्रव्यूह भेदत मुंबईच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. मध्यमगती गोलंदाज जावेद खानला तर त्याने एका षटकात चार चौकारसुद्धा खेचले. ३५ धावांवर असताना त्याला जीवदानही मिळाले. परंतु त्याचा आवेश मात्र कायम होता. अखेर ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक आदित्य तरेने त्याचा सुरेख झेल टिपला आणि शतकाकडे कूच करणारी ही खेळी अपूर्ण राहिली. दोन तास १० मिनिटे मैदानावर तग धरणाऱ्या बावणेने ११३ चेंडूंत १२ चौकार आणि २ षटकारांनिशी ८४ धावांची झुंजार खेळी उभारली. त्याला अर्धशतकी खेळी करत केदार जाधवने महत्त्वाची साथ दिली. प्रारंभीच्या षटकांमध्ये झहीर खान आणि ठाकूरने महाराष्ट्राची ३ बाद २४ अशी त्रेधातिरपीट उडवली होती; पण बावणे आणि जाधव यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. उत्तरार्धात महाराष्ट्राचा डाव पुन्हा गडगडला आणि दिवसअखेर त्यांची ७ बाद २१९ अशी अवस्था झाली.
त्याआधी, सकाळच्या सत्रात मुंबईच्या तळाच्या फलंदाजांनी अनपेक्षितपणे किल्ला लढवला आणि मुंबईला ४०२ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कर्णधार झहीर आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी आठव्या विकेटसाठी ११२ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. झहीरने चार चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या, तर अब्दुल्लाने तीन तास चिवट झुंज दिली. तो ३ चौकारांसह ४९ धावा काढून नाबाद राहिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा