Ranji Trophy Quarter Final 2024 Updates : रणजी ट्रॉफी २०२३-२४ मधील तिसरा उपांत्यपूर्व फेरी सामना रविवारी तामिळनाडू आणि सौराष्ट्र यांच्यात पार पडला. या सामन्यात तामिळनाडूने सौराष्ट्राचा एक डाव आणि ३३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. अशा प्रकारे तामिळनाडू संघाने २०१६-१७ नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात रविसरीनिवासन साई किशोर सामनावीर ठरला.
२००८-०९ नंतर प्रथमच पुजाराच्या रणजीत ८०० हून अधिक धावा –
तिसरा उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना हार्विर देसाईच्या ८३ धावांच्या जोरावर १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात तामिळनाडू संघाने साई किशाोर, भूपती कुमार आणि इंद्रजित यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ३३८ धावा केल्या आणि १५५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर सौराष्ट्राने दुसऱ्या धावात चेतेश्वर पुजाराच्या ४६ धावांच्या जोरावर १२२ धावा केल्या, परंतु संघाला पराभव टाळता आला नाही. पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये ८०० धावांचा टप्पा पार करण्याची ही तिसरी वेळ आहे. मात्र, २००८-०९ नंतर प्रथमच पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये ८०० हून अधिक धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या हंगामात पुजारा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने या मोसमाची सुरुवात द्विशतकाने केली होती. त्यानंतर त्याने २ शतकेही झळकावली.
शाश्वत रावतचे मुंबईविरुद्ध शतक –
रणजी ट्रॉफी २०२४ मधील दुसरा सामना मुंबई आणि बडोदा यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी बडोद्याचा स्टार फलंदाज शाश्वत रावतने मुंबईविरुद्ध शतक झळकावले. या युवा खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले पाचवे शतक आणि चालू हंगामातील चौथे शतक झळकावले. रावतने जिद्दीने फलंदाजी करत अवघ्या १२६ चेंडूत शतकी खेळी साकारली. त्याच्या १२४ धावांच्या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यानंतर बडोद्याचा पहिला डाव ३४८ धावांवर गारद झाला.शम्स मुलाणीने ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मुंबईने आपल्या डावाला सुरुवात करताना तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २१ करुन ५७ धावांची आघाडी घेतली.
आंध्र प्रदेशला विजयासाठी ७५ धावांची गरज –
चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत आंध्र प्रदेशने विजयासाठी १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९५ धावांत ४ गडी गमावले. हनुमा विहारी (४३) आणि करण शिंदे (५) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत क्रीजवर उपस्थित आहेत. आंध्र प्रदेशला विजयासाठी ७५ धावांची गरज आहे, तर त्यांच्या ६ विकेट सुरक्षित आहेत. मध्य प्रदेशकडून अनुभव अग्रवालने सर्वाधिक २ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : अश्विनने कुंबळेचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
विदर्भाची कर्नाटकविरुद्ध पकड मजबूत –
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाच्या ४६० धावांना उत्तर देताना कर्नाटकने पहिल्या डावात २८६ धावा केल्या. कर्नाटककडून निकन जोशने सर्वाधिक ८२ धावा केल्या. भक्कम आघाडी असलेल्या विदर्भ संघाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ५० धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाची एकूण आघाडी २१६ धावांची होती. सध्या अथर्व तायडे (२१) आणि ध्रुव शौरे (२९) क्रीजवर आहेत.